Tue, Nov 19, 2019 11:28होमपेज › Belgaon › आयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात 

आयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात 

Published On: May 06 2018 1:07AM | Last Updated: May 06 2018 12:29AMबेळगाव : प्रतिनिधी

उत्तर विभाग पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंडलगा कारागृहातील चौघांंना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. 
जयेश ऊर्फ जयेशकांत (वय 30, रा. अड्डीहोळे सिरीबागीलू, ता. पुत्तूर, केरळ), गौतमचंद्र बी. विजेंद्रनाथ (31, रा. हरिहर, मंगळूर), बी. डी. रामचंद्रय्या (40, रा. गोपालमयी, कोप्पळ), अरविंद नारायण पुजारी (36, रा. शिवमोग्गा), अशी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.  उत्तर विभाग पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांना त्यांच्या सरकारी मोबाईलवर 21 एप्रिल रोजी रात्री 9.15 च्या सुमारास  जीवे मारण्याची धमकी मोबाईलवरून देऊन एसएमएसही करण्यात आला होता. 24 रोजी एपीएमसी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

धमकी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांक 7090914584 ची छाननी केल्यानंतर सदर कॉल हिंडलगा कारागृहातून आल्याचे निदर्शनास आले होते. कारागृहातील कैद्यांकडून आयजीपींना देण्यात आलेल्या धमकीची गांभीर्याने दखल एपीएमसी पोलिसांनी तपासाला गती देऊन संबंधितांच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्याकरिता 30 रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर चौघांच्या चौकशीला संमती दिली होती. त्यानुसार दि. 5 रोजी एपीएमसी पोलिसांनी उपरोक्त चौघांची केली.

*अधिकार्‍यांचीही चौकशी?
कारागृहातील अधिकार्‍यांवरही चौकशीची टांगती तलवार आली आहे. सदर कैद्यांकडे कोणाच्या माध्यमातून मोबाईल फोन देण्यात आला ,कोणाच्या सांगण्यावरून व कोणत्या कारणावरून आयजीपींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, याची चौकशी करण्यात आली आहे.  कारागृहातील कर्मचार्‍यांची चौकशीही होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  मार्केट एसीपी विनय गावकर व एपीएमसी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रमेश हाणापूर यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.