Mon, Jun 01, 2020 02:09होमपेज › Belgaon › सात दिवसात मिळणार ओळखपत्र

सात दिवसात मिळणार ओळखपत्र

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:13AM
बेळगाव: प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यात झटपट मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. याला व्यापक प्रतिसाद लाभत असून नवमतदारांना सात दिवसाच्या आत ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा सहभाग असावा, यासाठी निवडणूक आयोगाने अभियान राबविले आहे. राज्यात होणार्‍या विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना नावनोंदणीची संधी देण्यात येणार आली असून सात दिवस झटपट मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

सदर अभियानाची सुरुवात रविवार दि. 8 पासून करण्यात आली असून त्यानंतर आठ दिवस नवमतदारांची नोंदणी करून घेण्यात आली. परिणामी नोंदणी नसणार्‍या मतदारांनी नावे नोंद केली.अभियानात नवीन नावनोंदणी, नाव, गाव, प्रभाग, मतदारसंघ, वय, जन्मतारीख बदल याबाबतची नोंद करून घेण्यात आली. यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय अभियान राबविण्यात आले. यासाठी 6, 7 व 8 क्रमांकाचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये अर्ज भरून घेण्यात आले

.नावनोंदणी केलेल्या मतदारांना सात दिवसाच्या आत मतदार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने प्रत्येक तहसीलदाराला दिला असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

मतदान केंद्रनिहाय अर्ज भरून घेण्यात आले असून दररोज तहसीलदार कार्यालयाकडे पाठवून देण्यात येत आहेत. यानंतर मतदार ओळखपत्र क्रमांक, फोटोसह निवडणूक आयोगाचे चिन्ह असलेले ओळखपत्र मतदारांना तहसीलदारांकडून पाठविण्यात येते.
अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला असून सर्वाधिक मतदार नोंदणी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात झाली आहे. 

या ठिकाणी पहिल्या दिवशीच 3632 मतदारांनी नोंदणी केली तर सर्वात कमी नोंदणी खानापूर तालुक्यात 563 इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकूण 38,191 मतदारांची नोंदणी झाली असून सदर अभियान 14 रोजी समाप्त झाले आहे. येत्या काळात मतदारांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. सदर मतदारांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात युद्धपातळीवर कामकाज सुरू आहे.

Tags : ID card,available ,seven days,belgaon news