Tue, Apr 23, 2019 21:37होमपेज › Belgaon › तयांचे बोल बोबडे नको मनावर...!

तयांचे बोल बोबडे नको मनावर...!

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:01AMवक्‍ता दशसहस्रेषु’ अशी म्हण काही वर्षांपूर्वी वापरली जायची. खमक्या आणि अभ्यासू राजकीय नेत्यांची भाषणे ऐकायला महापूर लोटायचा तोही स्वयंस्फूर्तीने. पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, अशी किती जणांची नावं घ्यावीत. त्यांची भाषणं म्हणजे अंगार, तेजस्वी आणि ओजस्वीही! निवडणुकीतली त्यांची भाषणं म्हणजे पर्वणीच असायची. 

एकमेकाची खिल्‍ली उडवताना राजकीय शुचिता कटाक्षानं जपली जात असे. अशा रेशमी चिमट्यांमुळं विरोधकांनाही गुदगुल्या व्हायच्या. पण आता ते दिन गेले, असं म्हणायची वेळ आली आहे. कारण कालौघात आता अनेक बदल घडत आले आहेत. नेत्यांची भाषा शिवराळ बनत चालली आहे. थेट आणि बिनबुडाचे आरोप करून वर्मी घाव घातले जात आहेत. यातून जनतेची अल्पकाळाची करमणूक होत असली तरी त्यांची ‘पातळी’ आणि ‘कुवत’ अधोरेखित होत असते. यामुळं त्यांचे विचार फारसे गांभीर्यानं न घेता ‘निव्वळ विनोद’ समजून ते हसण्यावारी घेतले जाते. यामुळं जनप्रबोधनाची आशा न केलेलीच बरी.बंगळूरमध्ये विविधभाषी लोक राहतात.त्यांना आकर्षित करण्यासाठी गुजरात, बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान आदी राज्यांतून नेते आयात केले जात आहेत. जिग्‍नेश मेवाणींची नुकतीच एका मतदारसंघात सभा झाली. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य केलं आणि व्हायचं ते झालं.

त्यांच्यावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. अशी अनेक प्रकरणं कर्नाटकात घडली. यापुढंही घडतील. पण नेत्यांच्या जिभेला लगाम घालणार कोण? निवडणूक आयोगही हतबल ठरतो आहे. युवराजांच्या पक्षात एक आसामी होती. त्यांना तब्बल 14 भाषा अवगत होत्या. पण त्यांनी लोकांना खूश करण्यासाठी असले प्रयोग केले नाहीत. 

‘ये जमीं कोई भारत का टुकडा नहीं है। ये जीता जागता राष्ट्रपुरुष है, ये वंदन की भूमी है.....।वाजपेयींच्या अशा काव्यपंक्‍तीतल्या विचारांवर जनता फिदा होते. पण आता असे वक्‍ते आणि त्याला भरभरून दाद देणारे अस्सल श्रोते खरंच दुर्मीळ झालेत. 
- सुनील आपटे