Sun, Jun 16, 2019 03:07होमपेज › Belgaon › ‘हुतात्मा भवन’ उभारणार कधी?

‘हुतात्मा भवन’ उभारणार कधी?

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 12:02AMबेळगाव : प्रतिनिधी

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकानजीक असणार्‍या खुल्या जागेत हुतात्मा भवन उभारणीची घोषणा हवेत विरून गेली आहे. नेत्यांना याचा विसर पडला असून स्मारकाच्या शेजारी असणार्‍या खुल्या जागेच्या उपयोगासाठी भवन उभारणीला पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

1 जून 1986 रोजी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हिंडलगा येथील बॉक्साईट रोडवर जागा खरेदी करून तालुका म. ए. समितीने हुतात्मा स्मारक उभारले आहे. स्मारकाशेजारी समितीच्या मालकीची जागा आहे. त्या जागी हुतात्मा भवन उभारणीची कल्पना तालुका म. ए. समितीने मांडली होती.

सीमाभागात समिती अनेक वर्षापासून कार्यरत आहे. परंतु, हिंडलगा येथील स्मारक वगळता समितीच्या मालकीची एकही वास्तू अथवा जागा नाही. कार्यकर्त्यांच्या बैठकी, कार्यालये यासाठी सार्वजनिक अथवा खासगी संस्थांच्या जागांचा वापर केला जातो. परिणामी समितीने हिंडलगा येथे उपलब्ध जागेमध्ये हुतात्मा भवन उभारण्याची संकल्पना मांडली होती. 

यामध्ये समितीचे कार्यालय व बैठकीसाठी सभागृह असा आराखडा निश्चित केलेला होता. 2014 च्या दरम्यान समितीच्या एका बैठकीत कार्यकर्त्यांना माहिती देऊन आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. काही ग्रामस्थ आणि वैयक्तिकरीत्या आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानंतर मात्र अधिक हालचाल करण्यात आली नाही. यामुळे हुतात्मा भवनाची संकल्पना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

मराठी नामफलकासाठी एल्गार

तालुका पंचायत कार्यालयात सदस्यांच्या नावाचा फलक केवळ कन्‍नडमध्येच लावलेला आहे. मराठी सदस्यांकडून यासाठी अनेक वेळा सभागृहात आवाज उठविण्यात आला असला तरी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार अधिकार्‍यांनी चालविला आहे. आगामी सर्वसाधारण बैठकीपूर्वी मराठी कागदपत्र व मराठी फलक न लावल्यास बैठक उधळण्याचा इशारा ता. पं. सदस्यांनी दिला आहे.

ता. पं. अधिकार्‍यांकडून नेहमीच आश्‍वासने दिली जातात. मात्र त्याची पूर्तता केली जात नाही. मराठीतून कागदपत्रे व सभागृहातील बैठकीचे इतिवृत्त मराठीत देण्यात यावे, यासाठी सभागृहात मराठी सदस्यांकडून अनेक वेळा आवाज बुलंद करण्यात आला. मात्र ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील व ता. पं.  अधिकार्‍यांनी मराठी भाषकांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. 

अध्यक्षांकडून होत असलेल्या एकाधिकारशाहीला लगाम लावण्याबरोबरच मराठी कागदपत्रांची पूर्तता कण्यात यावी, यासाठी विरोधी गटातील म. ए. समितीच्या सदस्यांसह भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी मराठी भाषक सदस्यांना पाठिंबा दर्शविला आहे. अध्यक्षांना हटविण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले होते. यावरून अध्यक्षांनी बोलविलेल्या दोन्ही सर्वसाधारण बैठकीला सदस्यांनी दांडी मारून कोरमअभावी बैठका रद्द करण्यास भाग पाडले होते. मराठी  सदस्यांनी घेतलेली भूमिका व तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यावेळी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी मराठी कागदपत्रांची पूर्तता व सदस्यांचा नामफलक मराठी व कन्‍नड भाषेत लावण्याचे आश्‍वासन दिले होते. निवडणुकांची आचारसंहिता संपून  जवळपास 25 दिवस उलटले. तरीदेखील कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया रखडली होती, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत असल्याचे ता. पं. सदस्यांकडून सांगण्यात येते. आश्‍वासन देऊन जवळपास तीन महिने लोटला आहे. तरीही दखल घेण्यात आलेली नाही. लवकरच ता. पं. बैठक बोलाविण्यात येणार आहे. यामुळे आगामी बैठक उधळून लावण्याचा इशारा सदस्यांकडून देण्यात आला आहे.