Sat, May 25, 2019 23:30होमपेज › Belgaon › मानवी गरजांनाही मराठीची काविळ!

मानवी गरजांनाही मराठीची काविळ!

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 11:19PMबेळगाव : प्रतिनिधी 

सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाल्याने वातावरणात प्रचंड बदल झाले आहेत. याचा मानवी आरोग्यावर मोठ्या परिणाम होतो. पावसाळ्यात पाण्यामुळे अनेक आजारांना कारण ठरत असते. यासाठी पाणी शुद्ध करून प्यावे, याबाबत तालुका पंचायत सभागृहामध्ये पीडीओ, ग्राम पंचायत सेक्रेटरी, वॉटरमॅन व गाव पातळीवरील पाणी व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन करण्यात आले. मात्र मार्गदर्शन केवळ कन्नडमध्येच झाल्याने बहुतांशी मराठी असलेल्या पंचायत सदस्यांना ते कळलेच नाही. मानवी गरजांच्या बाबतीत तरी कन्नड-मराठी भेदभाव होऊ नये, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली.
ग्राम पंचायतींना पाणी शुद्धीकरणासंदर्भात सरकारकडून ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे. थेट बंगळूरहून अधिकारी मार्गदर्शन करतात. 

पावसाळ्यात पाण्यात अनेक प्रकारचे क्षार मिसळतात. त्यामुळे पाण्याचे परिमाण बदलते. अशा पाण्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागते. त्यासाठी पाणी शुद्ध करुन नागरिकांना पुरविणे आवश्यक आहे.  यासाठीच सदर मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करुन घेण्यात यावा, नासाडी थांबवावी, गावागावामध्ये असणार्‍या वॉटरमॅननी पाणी सोडतेवेळी कोणती खबरदारी घ्यावी, पाण्याच्या शुद्धतेबद्दल कोणते नियम पाळावेत या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. 

पाणी अडवा, जिरवा

रेन हार्वेस्टींगद्वारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरवून पाण्याची अंतर्जल पातळी वाढविण्यास कशा प्रकारे मदत होते, याची माहितीही यावेळी देण्यात आली. सॅण्ड फिल्टर, कार्बन फिल्टर, मायक्रो फिल्टर या पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेबद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील विविध ग्राम पंचायतीचे सचिव, ग्रा. पं. सदस्य, पीडीओ, वॉटर कमिटी सदस्य यासह अधिकारी उपस्थित होते.