Wed, Jul 24, 2019 05:41होमपेज › Belgaon › सापांच्या अधिवासावर मानवाचे अतिक्रमण

सापांच्या अधिवासावर मानवाचे अतिक्रमण

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 8:25PM

बुकमार्क करा
बेळगाव : संदीप तारीहाळकर    

पर्यावरणात सापांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक पातळीवरही अनेक संघटना सर्प बचाव मोहीम राबवत आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना शेतात काम करत असताना अथवा साप दृष्टीला पडतात. मात्र चुकून सर्पदंश  होण्याचा धोका असल्याने सापांना ठार मारले जाते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा काळ सापांसाठी मीलन काळ असतो. त्यामुळे नागरी वस्तीतही त्यांचा वावर ठराविक ऋतुमध्ये अधिक होतो. सापांबद्दलच्या गैरसमजामुळे सापांची अधिक हत्या होत असून याबाबत प्रबोधन गरजेचे आहे. 

पश्‍चिम घाटात येणार्‍या बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यात सापांच्या शेकडो जाती आहेत. सापांचे पर्यावरणीय महत्व आणि त्यापासून घ्यावयाची दक्षता यावर प्रबोधन करण्यासाठी येळ्ळूर (बेळगाव) येथील सर्पमित्र आनंद चिठ्ठी व त्यांच्या पत्नी निर्झरा तसेच ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील मामासाहेब लाड सर्पशाळेचे प्रा. सदाशिव पाटील हे आपल्यापरीने व्याख्यानातून सर्पदंशाबाबतचे गैरसमज दूर करत आहेत.

बेळगाव परिसरात सरासरी दररोज 6 साप पकडले जातात. प्रामुख्याने नाग, धामण, घोणस, वेरुळा या जातीचे साप आढळतात. यामध्ये 40 टक्के नाग असतात. नाग , घोणस व इतर काही सापांचा ऑक्टोबर ते जानेवारी हा चार महिने मिलन काळ असतो. या दरम्यान मादी एक विशिष्ट प्रकारचा वास सोडते. या वासामुळे नर मादीकडे आकर्षित होतो. मादीच्या शोधासाठी नर आपलेे ठिकाण सोडून मानवी वस्तीत येतो. बर्‍याचवेळा नर व मादी एकाच ठिकाणी आढळतात. या दरम्यान, गवत कापणी, मळणी या कामांच्यावेळी सर्पदंशात वाढ होत आहे.  
सापांच्या अधिवासावर मानवाचे अतिक्रमण झाल्याने सापांची जीवनशैली बदलली आहे. त्याचा फटका सर्पदंशाने होत आहे. 

आनंद चिठ्ठी यांनी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथे 676 ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. ते प्रबोधनपर पुस्तकेही लिहित आहेत. आतापर्यंत त्यांनी 14 हजार सापांना जीवदान दिले आहे. त्यांची पत्नी निर्झरा या कर्नाटक राज्यातील पहिल्या महिला सर्पमैत्रीण ठरल्या आहेत. आजपर्यंत त्यांनी 820 सापांना जीवदान दिले आहे. याच धर्तीवर ढोलगरवाडी येथे 50 वर्षांपासून सर्पशाळा सुरू आहेत. संस्थापक कै.बाबुराव टक्केकर यांच्या प्रेरणेने प्रा. सदाशिव पाटीलही  प्रबोधनपर व्याख्यानातून गैरसमज दूर करण्यासाठी अग्रेसर आहेत.