Tue, Jun 18, 2019 22:39होमपेज › Belgaon › जिल्हा मागणीसाठी चिकोडीत मानवी साखळी

जिल्हा मागणीसाठी चिकोडीत मानवी साखळी

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 11:11PM

बुकमार्क करा

चिकोडी : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन चिकोडी जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी  शुक्रवारी चिकोडी शहरात वविविध संघटनांसह लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी रॅलीसह मानवी साखळी करून प्रशासनाला निवेदन सादर केले.

प्रारंभी शहरातील न्यायालयाच्या आवारातून चिकोडी वकील, डॉक्टर संघटनेसह विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थित बसव सर्कलपर्यंत शांतता रॅली काढण्यात आली. त्यानंतर बसव सर्कल येथे मानवी साखळी करण्यात आली. यावेळी चिकोडी नायब तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. 

बेळगाव जिल्हा 3 महसूल उपविभाग व 10 तालुके असलेल्या सर्वात मोठा असल्यामुळे प्रशासकीय कारभार चालवण्यास अनेक अडचणी येेतात. 1997 साली चिकोडी जिल्ह्याची घोषणा तत्कालीन सरकारने करुन मागे घेतली होती. चिकोडी उपविभागात कागवाड व निपाणी या नव्या तालुक्यांची निर्मिती केल्यामुळे अथणी, रायबाग, चिकोडी, कागवाड, निपाणी असे पाच तालुके अस्तित्वात येणार आहेत. चिकोडीत जिल्हा अतिरिक्त न्यायालय, दोन वरिष्ठ सिव्हिल, जेएमएफसी न्यायालये कार्यरत आहेत. तसेच शैक्षणिक जिल्हा, आरोग्य, आरटीओ, परिवहन, पीडब्ल्यूडी, जलसंपदा, अबकारी आदी जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच अनेक शिक्षण संस्था, शैक्षणिक केंद्र सुरु असून या भागाच्या विकासासाठी जिल्ह्याची निर्मिती त्वरित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चिकोडी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कल्मेश किवड म्हणाले,  नागरिकांच्या सोयीसाठी व प्रशासकीय कारभार परिणामकारी राबविण्यासह या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चिकोडी जिल्हा निर्मिती आवश्यक आहे. चिकोडी जिल्हा न झाल्यास पुढील काळात चिकोडीसह जिल्ह्यातील सर्व वकील संघटना तीव्र आंदोलन करणार आहेत. माजी आ. बाळासाहेब वड्डर म्हणाले, 1997 साली आपण आमदार असताना जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन केले असून सध्या चिकोडी जिल्ह्या निर्मितीस चांगली संधी आली आहे. यासाठी खासदार प्रकाश हुक्केरींच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा. 

संपादना स्वामीजी म्हणाले, संपूर्ण सीमाभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक  जिल्हा निर्मिती न केल्यास आपण 26 जानेवारीपासूनच्या आंदोलनात सहभागी होऊ. यावेळी आ. शशिकला जोल्ले, ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ,  अल्लमप्रभू स्वामीजी, आयएमचे अध्यक्ष श्याम पाटील, अ‍ॅड. एच. एस. नसलापुरे, अ‍ॅड. बी. आर. यादव, अ‍ॅड. पी. आर. कोंकणे, अ‍ॅड. सतीश कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिकोडी जिल्हा होणारच : खा. हुक्केरी

चिकोडी जिल्हा निर्मितीची मागणी यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे याबद्दल कोणीही शंका बाळगू नये. चिकोडी जिल्हा होणार हे निश्‍चित असल्याचे खा. प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.

न्यायालय आवारातील सभागृतहात चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी वकील संघटनेसह विविध संघटनांतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले,  चिकोडी जिल्ह्याची निर्मिती व्हावी ही आपली इच्छा  पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे आपण व आमदार गणेेश हुक्केरींनी आवश्यक सर्व जिल्हास्तरीय कार्यालय मंजूर करुन सुरू केली आहेत. 

आपण जिल्हा निर्मितीविषयी कधीही राजकारण केलेले नाही. त्यामुळे सर्वांनी संयमाने व शांततेने जिल्ह्याची मागणी करावी. यावेळी संपादना स्वामीजी,  अल्लमप्रभू स्वामीजी, बी. आर.संगाप्पगोळ, बाळासाहेब वड्डर यांनी मनोगत व्यक्त करुन जिल्हा निर्मितीसाठी खा. हुक्केरींनी पुढाकार घेण्याची मागणी केली.  यावेळी अ‍ॅड. सतीश कुलकर्णी, डॉ. सुधीर पाटील, अ‍ॅड. एच. एस.नसलापूरे, नगरसेवक गुलाब बागवान यांच्यासह सर्व वकील, डॉक्टर्स, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.