Thu, Apr 25, 2019 15:23होमपेज › Belgaon › हुक्केरी पिता- पुत्राची मतदारसंघावर जादू कायम

हुक्केरी पिता- पुत्राची मतदारसंघावर जादू कायम

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 7:58PMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी-सदलगा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश हुक्केरींनी भाजपच्या अण्णासाहेब जोल्ले यांचा तब्बल 10450 मताधिक्याने पराभव करत दुसर्‍यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे. यामुळे पुन्हा एकदा चिकोडी-सदलगा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे हुक्केरी पिता-पुत्रांनी सिध्द केले आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अर्थात 2008 पासून चिकोडी-सदलगा मतदारसंघावर काँग्रेसचे प्रकाश हुक्केरींची पकड आहे. भाजपकडून अनेक उमेदवार देऊन निवडणूक लढविण्यात आली  पण काँग्रेसकडून गड ताब्यात घेण्यात भाजपच्या पदरी अपयशच आलेे. यंदाच्या निवडणुकीत एकाच गावचे असलेले जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्लेंना भाजपने उमेदवारी दिली. जोल्ले उद्योग समूह व सहकारी क्षेत्रामुळे चांगले जाळे, जनसंपर्क लाभलेला जोल्लेंसारख्या प्रबळ उमेदवार रिंगणात उतरविल्याने भाजप व काँग्रेसमध्ये कडवी झुंज ठरली.

भाजपने एका वर्षांपासून  प्रत्येक गावात बुथपातळीवर काम करत पक्षबांधणीचे काम केले होते. तसेच जोल्लेंनी आपल्या संस्था व मुलगा बसवप्रसाद जोल्लेंच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित या मतदारसंघात जनसंपर्क ठेवला होता. तसेच उमेदवारी मिळाल्यानंतर राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आ. शशिकला जोल्ले यांच्यासह सर्व नेत्यांनी मतदारसंघात प्रचार कार्य हाती घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना चार्ज करत वातावरण निर्मिती केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभांचे आयोजन केले होते. सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता भाजपाच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित असल्याचे कार्यकर्ते मानले होते.  पण खासदार प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरींनी देखील कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा जिंकण्याच्या ध्येयाने मतदारसंघात राबविलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावागावात प्रचारकार्य राबविले. तसेच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलामनबी आजाद, खा.ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभांसह समाजांचे मेळावे घेतले. येथील अटीतटीच्या लढतीत गणेश हुक्केरी दुसर्‍यांदा आमदार झाले.

दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी विजयासाठी साम, दाम, दंड याचा वापर करत विजयासाठी सर्व प्रयत्न केले होते. तसेच या भागातील  अनेक भाजप नेत्यांंनी कोणत्याही स्थितीत भाजपचा उमेदवार निवडून येण्यास फिल्डींग लावली होती. तशातच मतदानाची टक्केवारी वाढल्याने भाजपचा उमेदवाराचा विजय निश्‍चित मानण्यात येत होते. त्यामुळे  प्रकाश हुक्केरींच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. शेवटी खासदार प्रकाश हुक्केरींच्या रणनीतीची जादू चालल्याने आमदार गणेश हुक्केरी विजयी झाले. 

विजयाची कारणे 

- विकासकामांमध्ये आघाडीवर
- स्थानिक पातळीवर पक्षबांधणी 
- खा. प्रकाश हुक्केरींचे वर्चस्व
- सर्व समाजांशी संपर्क  पराभवाची कारणे 
- मतदारसंघात नवा चेहरा
- मोदींच्या सभेचा प्रभाव नाही
- मोठी आश्‍वासने
- संघटनात्मक प्रचार