Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Belgaon › हुकेरी विधानसभा मतदारसंघ : आ. उमेश कत्ती यांच्यासमोर आव्हाने

सलग सत्ता, सापडावा विकासाचा पत्ता

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 9:16PMबेळगाव : प्रतिनिधी

राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत असणार्‍या हुकेरी मतदारसंघात अनेक समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. आ. उमेश कत्ती यांना मतदारांनी सतत साथ देऊनही अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. येत्या पाच वर्षात त्यांना भिडण्याचे काम कत्ती यांना करावे लागणार आहे.

आ. कत्ती मागील 25 वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व  करत आहेत. एकदा शशिकांत नाईक यांच्याकडून झालेला पराभव वगळता हा मतदारसंघ कत्ती यांच्याकडेच आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. कत्ती यांनी माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा पराभव करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मतदारसंघातील जनतेच्या समस्यांची चांगली जाण आ. कत्ती यांना आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

हुक्केरी मतदारसंघ शेतीप्रधान मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना हिरा शुगरच्या माध्यमातून उभा राहिला. हिरण्यकेशीच्या नदीच्या काठावर असणारी ऊस शेती तालुक्याचा आर्थिक डोलारा सांभाळते. मात्र काही वर्षापासून ऊस उत्पादक शेतकरी अडचणीच्या गर्तेत सापडत चालला आहे. शेतकर्‍यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या हिरा शुगरकडून उस बिले थकीत होत आहेत. आ. कत्ती यांनी उभारलेल्या खासगी साखर कारखान्यामुळे सहकारी तत्त्वावर चालणारा हिरा साखर कारखाना अडचणीत सापडत चालला आहे.

सरकारी शाळांच्या इमारतींची स्थिती दयनीय बनत आहेत. काही शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. संकेश्‍वर शहराचा विकास, चित्री प्रकल्पातील पाणी मिळवण्याचा प्रश्‍न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, आवास योजनातील भ्रष्टाचार, हुकेरी शहरातील सांडपाणी निचरा प्रकल्प आदी आव्हानांवर तोडगा काढण्याचे काम आ. कत्ती यांना करावे लागणार आहे. 
हुकेरी तालुक्यातील शेती कसदार म्हणून ओळखली जाते. मात्र सिंचनव्यवस्था अपुरी आहे.  परिणामी बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे.

हिरा शुगर वाचवा

जिल्ह्यातील जुना साखर कारखाना म्हणून हिरा शुगरची ओळख आहे. हुकेरी, चिकोडी आणि गडहिंग्लज तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यामुळे या भागात ऊस उत्पादनात क्रांती झाली आहे. शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावला. मात्र अलीकडच्या काळात कारखाना कर्जाच्या गाळात अडकत चालला आहे. यामुळे ऊस उत्पादकांची बिले देतानादेखील कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. यावर उपाययोजना करावी लागेल.

संकेश्‍वर शहराचा विकास

मतदारसंघातील हुकेरीनंतर संकेश्‍वर हे एकमेव मोठे शहर आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेले संकेश्‍वर अनेकदृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र विकासकामे रेंगाळली आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना नागरी समस्याही वाढत आहेत. यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. संकेश्‍वर शहराच्या बसस्थानकाची सध्या उभारणी करण्यात येत आहे. येत्या काळात संकेश्‍वरातील वाहतूक समस्या, रस्ते रुंदीकरण, पाणी, सांडपाणी निचरा आदी समस्या दूर कराव्या लागणार आहेत.

पाणी समस्येवर उपाय

मतदारसंघाची जीवनदायिनी म्हणून हिरण्यकेशी नदी ओळखली जाते. या नदीच्या पाण्यामुळे शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय काढणे काही प्रमाणात  शक्य झाले आहे. नदीचे पात्र मार्च महिन्यानंतर कोरडे पडते. त्यासाठी चित्री प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी प्रत्येक वर्षी महाराष्ट्राकडे करावी लागते. त्यावर कायम स्वरुपी उपाययोजना आखावी लागणार आहे.

शाळा इमारतींची दुर्दशा

मतदारसंघातील पश्‍चिम भागात कानडीबरोबर मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पश्‍चिम भागात कानडी व मराठी प्राथमिक सरकारी शाळाही आहेत. तथापि, काही गावांमध्ये दोन्ही शाळा इमारतींची दुर्दशा झाली आहे. अनेक शाळांनी शंभरी पार केली आहे. यामुळे इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक बनल्या आहेत. अशा धोकादायक इमारतीमध्ये बसून ज्ञानार्जनाचे काम विद्यार्थी करत आहेत. पावसात ही समस्या अधिक गंभीर बनते. त्यावर त्वरित उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे.

शेतकर्‍यांना हवा दिलासा

मतदारसंघ शेतीप्रधान आहे. ऊस, जोंधळा, भुईमूग, सोयाबीन, मूग आदी पिके घेण्यात येतात. यापैकी ऊस पिकासाठी अधिक पाण्याची आवश्यकता असते. ही तहान हिरण्यकेशी नदीतील पाण्यावर भागविली जाते. मात्र अन्य पिके मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून आहेत. तालुक्यात कोणतीही सिंचन योजना नाही. काही तलाव वगळता पाणी समस्या सुटण्यासाठी ठोस उपाययोजनांची वानवा आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सिंचन योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागणार आहेत.

बेरोजगारीची समस्या

मतदारसंघातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मतदारसंघात साखर कारखाना व कणगला येथील हिंदुस्थान लॅटेक्स हा सरकारी प्रकल्प  वगळता अन्य मोठा कारखाना नाही. यामुळे स्थानिक तरुणामध्ये बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. युवकांच्या हाताना काम देण्यासाठी याठिकाणी एखादा मोठा कारखाना आणण्याचे आव्हान आ. कत्ती यांना पेलावे लागणार आहे.महामार्गावरच वसलेले गाव अशी ओळक असूनही संकेश्वरचा विकास अपेक्षित गतीने झालेला नाही.