Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Belgaon › निपाहबाबत प्रशासन किती सजग ?

निपाहबाबत प्रशासन किती सजग ?

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 26 2018 11:53PMबेळगाव : प्रतिनिधी

प्राणघातक निपाहबाबत राज्यभरातून घेण्यात येत असलेल्या खबरदारीच्या पार्श्‍वभूमीवर बेळगाव प्रशासनाकडून होत असलेले प्रयत्न पाहता या रोगाबाबतची माहिती लोकांना करून देण्याकरिता बैठका घेतल्या. मात्र प्रशासनाकडून यापुढे जाऊन अधिक काही केल्याच दिसत नाही. 

शेजारच्या धारवाड-हुबळी प्रशासनाने उपाययोजनांचा आढावा  घेतल्यास जिल्हा प्रशासनाकडून होत असलेली प्रत्यक्ष कार्यवाही तसेच जनसामान्यांना देण्यात येणारे स्पष्ट निर्देश यामुळे प्रशासन निपाहबाबत खर्‍या अर्थाने गंभीर असल्याचे दिसते.

धारवाड हुबळी महानगर पालिकेकडून निपाह रोगासाठी कारणीभूत ठरणार्‍या वटवाघळांचे  ज्या झाडांवर वास्तव्य आहे. अशा झाडांचा शोध घ्यावयास सुरूवात केली आहे. वनविभागाकडे हे काम सोपविण्यात आले असून सोबत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनाही या कामासाठी जुंपण्यात आले आहे. डुकरांपासूनही धोका संभवत असल्याने शहर परिसरात मोकाट फिरणार्‍या डुकरांचा बंदोबस्तही हाती घेतला आहे. डुक्‍कर पालन करणार्‍यांचा कोणताही मुलाहिजा न करता डुक्‍कर पालन करणार्‍यांना या मोहिमेला सहकार्य करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे आरोग्याधिकारी  पी. एन. बिरादर स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. डुकरांना शहराबाहेर हलविण्याचे काम करणार्‍यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. वेळीच केलेल्या उपचाराने या रोगावर मात करता येणे शक्य आहे. मात्र उपचारातील दिरंगाईने रूग्ण दगावू शकतो. कर्नाटका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (किम्स)व प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात येत आहे.

किम्सच्या अधिकार्‍यांना  बैठका व कार्यवाहीतही सामिल करून घेण्यात आले आहे. लोकांमधे या रोगाबाबतची जागृतीही करण्यात येत आहे. महानगराच्या हद्दीतील तसेच परिसरातील सर्व  खुल्या विहिरी झाकण्यात येत आहेत. त्यामुळे वटवाघळांना येथे आश्रय घेता येणार नाही. त्यामुळे पाणवठे सुरक्षित राहतील. 140 आरोग्य रक्षकांची नियुक्‍ती करून सांडपाण्यात वाढणार्‍या जंतूंचा बंदोबस्त करण्यात येत आहे. महिन्यातून दोनवेळा ही मोहीम राबविण्यात येत आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाकडूनही हुबळी धारवाड जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचा पाठपुरावा होणार काय, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहेत.