Mon, Mar 25, 2019 17:50होमपेज › Belgaon › इमारतींच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुली 

इमारतींच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुली 

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:13AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

इमारत मालकांच्याकडून स्वयंघोषित कर योजनेप्रमाणे घरपट्टी वसूल करण्याची पध्दत बेळगाव शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून अमलात आणलेली आहे. या पध्दतीनुसार इमारतींचे मोजमाप किती आहे हे मालकांनीच नमूद करुन मनपाला दिले पाहिजे. परंतु शहरातील हजारो इमारत मालक इमारतींचे मोजमाप कमी दाखवून घरपट्टी भरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे मनपाच्या घरपट्टी महसुलामध्ये काही कोटी रुपयांचा कर बुडत असल्याने त्याचा फटका मनपाला दरवर्षी बसत आहे. ही उणीव दूर करुन प्रत्यक्ष इमारतीच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुल करण्यासाठी मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांच्या आदेशानुसार मनपा महसूल विभागाने शहरातील इमारतींचे मोजमाप घेऊन घरपट्टी वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून ही मोहीम मनपाने सुरु केलेली असल्याने प्रत्यक्षात इमारतींचे मोजमाप कमी दाखविलेल्या घरमालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त एम. आर. रविकुमार व जी. प्रभू यांनीही हाती घेतली होती. या मोहिमेमुळे मनपाच्या घरपट्टी उत्पन्नामध्ये काही कोटी रुपयांची भर पडली होती. मनपाने पुन्हा ही मोहीम हाती घेतल्याने मनपाच्या घरपट्टी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. 

इमारती सर्वेक्षणाचे कामकाज महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. मंगळवारी पांगुळ गल्ली व इतर ठिकाणच्या इमारतींचे मोजमाप करण्यात आले. या मोहीमेमध्ये मनपा आयुक्त शशिधर कुरेर हे ही सहभागी झाले आहेत.