Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Belgaon › होसूर घाट परिसर बनला ‘ओपन बार’

होसूर घाट परिसर बनला ‘ओपन बार’

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 8:13PMबेळगाव : प्रतिनिधी

उचगाव- कोवाड मार्गावर अतिवाड फाटा ते होसूर घाट परिसरात मद्यपींचा वावर कमालीचा वाढला आहे. रस्त्याला लागून असणारे माळ रान आणि झाडेझुडपांचा आधार घेऊन मद्यपानाच्या प्रकारात वाढ होत आहे. तसेच शेतवडीत बाटल्यांच्या काचामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत  आहे. 

गेल्या कित्येक वर्षापासून अतिवाड फाटा ते होसूर घाट मार्ग सायंकाळी 7 नंतर निर्जन असायचा. या घाट मार्गावर अंधारात भुरट्या चोरांचाही सामना काही दुचाकीचालकांना करावा लागला आहे. यामुळे रात्री येथे भीतीचे वातावरण असायचे. मात्र, सध्या या मार्गावर याउलट चित्र आहे. कधी नव्हे ते या मार्गावर  हॉटेलची संख्या वाढत आहे. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत वाहनांची वर्दळ सुरू आहे. याठिकाणी बेकायदा मद्यविक्री सुरू आहे. त्यामुळे रात्री अपरात्री मद्यपींचा वावर सुरु आहे. झुडपांच्या आड बसणार्‍या मद्यपींकडून शेतामध्ये बाटल्या फोडत असल्याने शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

अवैध मद्यविक्रीने बेकिनकेरे, अतिवाडसह महाराष्ट्र हद्दीतील होसूर, कौलगे, बुक्कीहाळ परिसरातील तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. मात्र, वरकमाई होत असल्यानेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे. या सर्व प्रकाराबाबत अबकारी खाते व पोलिसांसह स्थानिक ग्रा.पं. प्रशासन अळीमिळी चुप अशीच भूमिका घेतली असल्याची चर्चा सुरू   आहे.