Tue, Nov 20, 2018 03:43होमपेज › Belgaon › ऊस बिलाअभावी उत्पादक हवालदिल

ऊस बिलाअभावी उत्पादक हवालदिल

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:03AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

चालू वर्षातील ऊस गळीत हंगाम निम्मा संपला असला तरी साखर कारखान्यांकडून ऊसदर निश्‍चित करण्यात टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकर्‍यांना अद्याप बिलाची प्रतीक्षा करावी लागत असून त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60 लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

जिल्ह्यातील ऊसगाळप हंगामाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली. गळीत हंगामाला सुमारे दोन महिने पूर्ण होत आले असून यावर्षीचा हंगाम आगामी काळात केवळ दोन ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता आहे. परंतु, ऊसपुरवठा केलेल्या शेतकर्‍यांना अद्याप बिल देण्यात आलेले नाही.

जिल्ह्यात एकूण 24 साखर कारखाने आहेत. यापैकी 10 सहकारी व 11 खासगी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत (16 डिसेंबर) 60 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. यातून 62 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप बिल अदा केलेले नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल बनला आहे. यामध्ये पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या कारखान्याचाही समावेश आहे. 

याबाबत नुकतेच शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते. यामुळे त्यांच्या कारखान्याला कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकार्‍यांनी पाठविली आहे. 
जिल्ह्यात ऊस दर जाहीर करण्यात निपाणी येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. त्यांनी 3151 रु. इतक्या दराची घोषणा केली आहे. परंतु खासगी  कारखानदारांनी हा दर आपणास परवडण्यासारखा नसल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे शेतकर्‍यांची गोची झाली आहे.