बेळगाव : प्रतिनिधी
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना कडवी टक्कर द्यावी लागतेय ती भाजपशी. त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांनी आपला सारा अनुभव या निवडणुकीत पणाला लावला आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक काँग्रेसपेक्षा आत्मप्रतिष्ठेची ठरली आहे. यामुळेच की काय त्यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समवेत राज्यात प्रचाराचा एकहाती किल्ला लढवलेला आहे. 222 पैकी पारड्यात किती पडणार, यावर आता उद्या 15 रोजी त्यांचा दम दिसणार आहे.
यापूर्वी त्यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्रिपद सांभाळले. पण मख्यमंत्री झाले नाहीत. काही वर्षांपूर्वी सिध्दरामय्या काँग्रेसचे कट्टर विरोधक राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी काँगे्रसवर कडवे प्रहार केले होते. निजदमधून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये आश्रय घेतला. याचे फळ त्यांना मिळाले, ते कर्नाटकाचे सरदार झाले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भगव्या लाटेत सारा देश भाजपसोबत आला. अनेक राज्यांत काँगे्रसचे पानिपत झाले. पण सिध्दरामय्या यांनी कर्नाटकात तसे होऊ दिले नाही. त्यांनी पक्षाची लाज राखताना मोदी यांचा वारू रोखण्यात बर्यापैकी यश मिळवले होते. याचा काँग्रेसवर अपेक्षित परिणाम झाला. कारण त्यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सिध्दरामय्या यांनाच नेतृत्वाची धुरा सोपवली. यामुळेच सिध्दरामय्या यांच्यावर दुहेरी जबाबदारी आली आहे. आपल्या सत्ताकाळात त्यांनी अनेक ‘भाग्य’ योजना राबवल्या आहेत. मोदी यांनी सत्तारूढ झाल्यावर काही क्रांतिकारी निर्णय घेतले, ते घेताना त्यांनी स्वकियांनाही जुमानले नाही. नोटाबंदी लागू करताना पक्षातल्याच ज्येष्ठांनायाचा मागमूसही नव्हता. ‘बेधडक निर्णयांचे पंतप्रधान’ अशी मोदी यांची ओळख बनली आहे.
कर्नाटकातही सिध्दरामय्या यांनी अनेक धाडसी आणि खजिन्यावर भार टाकणारे जनहिताचे निर्णय घेऊन विरोधकांच्या टीकाटिपणीतली हवा काढून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. याला पक्षश्रेष्ठींनी विरोध न करता सिध्दरामय्यांना पुढे जाण्यास एक प्रकारे प्रोत्साहनच दिले. परिणामी सिध्दरामय्या यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. यामुळेच त्यांनी कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच, अशी खात्री व्यक्त केली आहे.
भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांनी आम्हाला 145 जागा मिळून सर्वत्र कमळ फुलेल, असे म्हटले आहे. यावर सिध्दरामय्या यांनी म्हटले, ‘त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. भाजपला कधीच सत्ता मिळणार नाही.’ यातून सिध्दरामय्या यांचा जिंकण्याचा आशावाद प्रकट होतो. आता निकाल एक दिवसावर आहे. सिध्दरामय्या यांचा दिसेल का दम?