होमपेज › Belgaon › मधमाशी बनणार कर्नाटकाचा ‘राज्य कीटक’

मधमाशी बनणार कर्नाटकाचा ‘राज्य कीटक’

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 27 2018 8:05PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्य प्राणी, पक्षी आणि फुलपाखराला मान्यता दिल्यानंतर आता राज्याचा कीटक ठरविण्यात येणार आहे. कर्नाटक जैवविविधता महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यावर शिक्‍कामोर्तब झाल्यास ‘मधमाशी’ला राज्य कीटक म्हणून ओळखले जाणार आहे. अशी मान्यता देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

महामंडळाचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तसा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. याविषयी तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर रितसर प्रस्ताव पाठविला जाईल. पर्यावरण संतुलनामध्ये मधमाशी महत्त्वाची भूमिका बजावते. कर्नाटकात अनेक ठिकाणी मधुमक्षिकापालन केले जाते. पण, वाढत्या शहरीकरणाचा फटका मधमाशीला बसत आहे. शहरी भागात या कीटकाचे प्रमाण कमी आहे. शेतीसाठी वापरण्यात येणार्‍या रासायनिक खतांमुळे मधमाशीवर परिणात होत आहे.

राज्य कीटक म्हणून मान्यता मिळाल्यास मधमाशीला वाचविण्यासाठी, तिच्या महत्त्वाबद्दल जागृती करण्यात येईल. मधमाशीची पर्यावरण संतुलनातील भूमिका किमी महत्त्वाची आहे हे पटवून दिले जाईल. बदाम, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री, लिंबू, कोबी, कोथिंबीर, काकडी, फ्लॉवर, गाजर, कांदा, सूर्यफूल, मोहरी, लवंग यासह विविध प्रकारच्या पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाशीची भूमिका महत्त्वाची असते.2016 मध्ये राज्य वन्यजीव महामंडळाने ‘सदर्न विंग बटरफ्लाय’ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले होते. महाराष्ट्रानंतर फुलपाखराची निवड करणारे कर्नाटक हे दुसरे राज्य बनले होते. आता राज्य कीटकाची निवड करणारे कर्नाटक हे पहिलेच राज्य बनणार आहे.

मधमाशीची वैशिष्ट्ये

हजारो वर्षांपासून हा कीटक अस्तित्वात आहे. मानवासाठी अन्न निर्माण करणारा एकमेव कीटक म्हणून मधमाशीची ओळख आहे. मधमाशीने तयार केलेल्या मधामध्ये विविध जीवनसत्त्वे असतात. शंभरपेक्षा अधिक फुले या माशीला ओळखता येतात. काही मीटर अंतरावरून फुलामध्ये मध, परागकण आहेत की नाही,  हे मधमाशीला ओळखता येते. एका सेकंदाला 200 वेळा तिचे पंख वर-खाली होऊ शकतात. यामुळेच मधमाशी आली की ‘सुई..ई..’ असा आवाज येतो. एकाचवेळी ताशी 15 मैल वेगाने सुमारे 6 मैल उडण्याची क्षमता असते. मधमाशी हजारो फुलांवरून फिरल्यानंतर एक चमचा मध साठवते. प्रत्येक माशी आपल्या जीवनात चमच्याचा केवळ बारावा भाग म्हणजे केवळ दोन ते तीन थेंब मध साठवते. एक किलो मध साठविण्यासाठी मधमाश्या सुमारे 90 हजार मैल प्रवास करतात. पृथ्वीभोवती तीनवेळा प्रदक्षिणा घालण्याइतके हे अंतर आहे. यांचे आयुष्य केवळ सहा आठवड्यांचे असते. यातील राणी माशी 5 वर्षे जगू शकते. मधमाश्यांच्या पोळामध्ये अंडी घालण्याचे काम तिच्याकडे असते.