Sat, Aug 17, 2019 16:24होमपेज › Belgaon › गृहरक्षक तीन महिने वेतनाविना

गृहरक्षक तीन महिने वेतनाविना

Published On: Aug 02 2018 1:56AM | Last Updated: Aug 01 2018 7:34PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी खात्यांमध्ये मानधनाच्या आधारावर इमारतीचे संरक्षण, बंदोबस्तासह इतर कामांसाठी नियुक्‍त करण्यात येणारे गृहरक्षक दलातील कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनयातना भोगत आहेत. वेतन न मिळाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे आहे.

राज्यात सुमारे 25 हजार गृहरक्षक दलातील कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था, रहदारी विभागात सर्वाधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अनेकजण विविध कामे करत असून गृहरक्षक म्हणूनही काम करत आहेत. काहीजण पूर्णपणे याच कामावर विसंबून आहेत. येथे मिळणार्‍या अल्प वेतनावर कुटुंबीयांचे पोट भरणे शक्य होत नाही. निवडणुकीवेळी पूर्ण प्रमाणात गृहरक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्‍ती केली जाते. सध्या एका बंगळूर शहरात 4,882 रक्षक कार्यरत आहेत.

विविध खात्यांमध्ये गृहरक्षकांची नियुक्‍ती केली जाते. या रक्षकांना द्यावयाच्या मानधनाबाबतचा प्रस्ताव संबंधित खात्याकडून अर्थ खात्याला पाठविला जातो. त्यानंतर सरकारकडून वेतनासाठी अनुदान मंजूर केले जाते. या प्रक्रियेला विलंब होत असल्याने गृहरक्षकांच्या हातात उशिरा वेतन मिळते. 

आर्थिक वर्ष संपल्याने नूतणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी अर्थसंकल्पानंतर मे, जून आणि जुलै महिन्यात गृहरक्षकांना उशिरा वेतन मिळते. थोडा विलंब झाला तरी वेतन निश्‍चितपणे जमा केले जात असल्याची माहिती गृहरक्षक खात्याचे वरिष्ठ देतात. वेतन देण्यास विलंबामुळे रक्षकांकडून गृहखात्याच्या वरिष्ठांकडे तक्रार केली जाते. ज्या खात्यामध्ये रक्षकाची नेमणूक असेल तेथे वरिष्ठ संपर्क साधून मानधन मंजूर करण्याबाबत आवाहन करतात. 

विधानसभा निवडणूक झाल्यापासून वेतन मिळालेले नाही. तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत असताना अशा अडचणी आल्यास कुटुंबाचे पोट भरणे शक्य नाही. कर्जबाजारी व्हावे लागते. सरकारी कर्मचार्‍यांना तीन महिने विलंबाने वेतन दिले तर चालेला का? असा प्रश्‍न गृहरक्षकांतून होत आहे.