होमपेज › Belgaon › होमिओपॅथीला लोकमान्यता आहे, राज्यमान्यता कधी?

होमिओपॅथीला लोकमान्यता आहे, राज्यमान्यता कधी?

Published On: Aug 15 2018 2:05AM | Last Updated: Aug 14 2018 8:45PM



बेळगाव : प्रतिनिधी

होमिओपॅथीचे पुनरुत्थान करण्यासाठी संशोधनाची गरज आहे. सरकारकडून निधी मिळत नसल्याने संशोधनात अडचणी येतात.  अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांप्रमाणे होमिओपॅथी डॉक्टरांना देखील सामाजिक दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी आयुष मंत्रालयाने पुढाकार घेतला पाहिजे. राज्यभरातील स्थानिक पातळीवरील होमिओपॅथीक डॉक्टरांनी एकत्रित संघटीत होऊन यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या होमिओपॅथीला लोकमान्यता आहे, मात्र, शासनाची उदासिनता असल्याने याला राज्यमान्यता कधी मिळणार, असा प्रश्न शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी व्यक्त केली.

दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयात सोमवारी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञ बोलत होते. सध्या होमिओपॅथी तज्ज्ञांची संख्या बर्‍यापैकी असून वाजवी दरांमध्ये उपचार दिले जातात.  अनेक विकारांमध्ये फक्त होमिओपॅथी अतिशय चांगल्याप्रकारे उपयुक्त ठरते, असे दसत आहे. होमिओपॅथीच्या उपचारांबद्दल आता कोणालाच शंका नाही. आता राहतो प्रश्‍न तो शासनाने जलदगतीने यावर निर्णय घेण्याचा. तो घेतला पाहिजे, असेही मत तज्ञांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागात होमिओपॅथी पोहचली पाहिजे. सध्या 5 हजार लोकसंख्या असलेल्या खेडेगावात एकही होमिओपॅथी डॉक्टर नाही, ही खंत आहे. होमिओपॅथीच्या प्रसारासाठी स्वतः डॉक्टरांनी पुढाकार घेतला पाहिजे. संघटना करून होमिओपॅथीच्या प्रसारासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी एकत्रित काम केले पाहिजेत, असेही विचार डॉक्टरांनी मांडले. 

सरकारी पातळीवर होमिओपॅथीचा प्रसार केला जात नाही. संशोधन करण्यासाठीदेखील फंड दिला जात नाही. संशोधन करून औषधे शोधून काढली तरी ती अ‍ॅलोपॅथी म्हणजे रसायनयुक्त औषधांच्या निकषांमध्ये मांडली तरच निधीबाबत विचार होऊ शकतो, असे सरकार सांगते. यामुळे संशोधन करताना देखील अडचणी येतात, असा अनुभव डॉक्टरांनी मांडला. 

आयुष विभागात अनेक मोठी पदे आहेत. त्यावर  तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांची नेमणूक करणे गरजेचे आहे. असेही मत तज्ञांनी मांडले.   होमिओपॅॅथीची जागृती करण्यासाठी सरकार उदासिन दिसत आहे. यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी संघटीत होऊन काम करणे गरजेचे आहे, अशीही मते व्यक्त करण्यात आली.