Wed, May 22, 2019 14:50होमपेज › Belgaon › जकुबाई पूजेला ऐतिहासिक परंपरा

जकुबाई पूजेला ऐतिहासिक परंपरा

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 8:20PMगळतगा : वार्ताहर

पारंपरिक रितीरिवाज जोपासत भीमापूरवाडी येथे बेंदूर सणानंतर श्रावण महिन्यापर्यंत प्रत्येक आठवड्याचा मंगळवार व शुक्रवार जकुबाई पूजा करण्याची ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. प्रत्येक वर्षी ही विधीवत पूजा करुन पुरण-पोळीची परडी सोडत भाविकांनी परंपरा अबाधित ठेवली आहे.या पूजेबाबत ज्येष्ठ मंडळी म्हणतात, पूर्वीपासून जकुबाई पूजा घरोघरी करण्यात येते. प्रत्येक कुटुंब तीन वर्षांतून एकदा ही पूजा करते. गावातून लग्‍न होऊन बाहेर गेलेली महिलाही तीन वर्षातून एकदा येऊन पूजा करण्यात येते. बेंदूर सण संपताच प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व शुक्रवारी ही पूजा करण्यात येते. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी गावातील सरासरी 20 ते 25 कुटुंबांतर्फे जकुबाईची पूजा करुन परडी सोडण्यात येते.

या पूजेचे अधिक महत्त्व असून गावात येणार्‍या हेळवींकडूनही तीन वर्षातून एकदा पूजा होते. शिवाय भीमापूरवाडीतील कुटुंबांसह परिसरात राहणार्‍या शेतकर्‍यांकडूनही ही पूजा करण्यात येते. गावाच्या ओढ्याकाठी जकुबाई देवस्थान असून त्याठिकाणी पूजा करुन ओढ्यामध्ये परडी सोडण्याची परंपरा आजतागायत जोपासण्यात आली आहे.सध्या जकुबाई देवस्थान परिसरात झाडे-झुडपे वाढली असून स्वच्छतेची गरज आहे. शिवाय उतरण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था नसल्याने भाविकांना अडचणीचे होत आहे. ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी छोटे मंदिर उभारुन भाविकांसाठीही बैठक व्यवस्था आवश्यक आहे. गावात सुमारे 400 कुटुंबे असून पूजेला प्रत्येकवेळी सुमारे 25 ते 30 कुटुंबीय नंबरमध्ये असतात.पावसाळ्यात भाविकांची गैरसोय होत असल्याने गावातील ग्रा. पं. सदस्यांनीही ग्रामसभेत आवाज उठविण्याची गरज आहे. जकुबाई पूजेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन याठिकाणी मंदिर उभारण्यासह भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.