होमपेज › Belgaon › हिंदुत्ववाद्यांच्या हत्या रोखा

हिंदुत्ववाद्यांच्या हत्या रोखा

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 10:35PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील हिंदुत्ववाद्यांच्या हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे जातीय सलोखा धोक्यात आला आहे. राज्यातील सरकार निष्क्रिय असून यामुळे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते अडचणीत सापडले आहेत. हे रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत; अन्यथा येेत्या निवडणुकीत याचा जाब द्यावा लागेल, असा इशारा विहिंप-बजरंग दलाच्या वतीने काढलेल्या मोर्चाद्वारे देण्यात आला.राज्यातील हिंदुत्ववाद्यांच्या हत्या रोखण्याचा इशारा देण्यासाठी रविवारी विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात धर्मवीर संभाजी चौकातून झाली. नंतर किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे मोर्चा राणी चन्नम्मा चौकात आला. हातात भगवे ध्वज घेऊन हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्याकडून काँग्रेस सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. हत्या झालेल्या कार्यकर्त्यांची छायाचित्रे हातामध्ये घेण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत राज्यभरातील 13 हिंदू कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.

कडेकोट बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राखीव पोलिस दलाच्या तुकडीसह वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने उपस्थित होते. मोर्चासाठी सकाळपासून कॉलेज रोडला जोडणारे मार्ग रोखून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. यामुळे बाहेरून येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मोर्चा जाणार्‍या मार्गावरील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती.