होमपेज › Belgaon › हिंडलगा ग्रामपंचायत ‘अध्यक्ष ‘अविश्‍वासा’ला स्थगिती

हिंडलगा ग्रामपंचायत ‘अध्यक्ष ‘अविश्‍वासा’ला स्थगिती

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:36PMबेळगाव : प्रतिनिधी 

हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्षांवर आणण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाला बंगळूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गुरुवारी ग्रा. पं. कार्यालयात प्रांताधिकारी कविता योगपन्नावर यांनी ही माहिती दिली. बंगळूर न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा अविश्‍वास ठराव रेंगाळला आहे.हिंडलगा ग्रा. पं. मध्ये म. ए. समितीची सत्ता आहे. त्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रीय पक्षाच्या सदस्यांकडून सुरू आहे. यामुळे अध्यक्षा लक्ष्मी पिसे यांंच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यात आला आहे. यापूर्वी उपाध्यक्षा गीता चौगुले यांच्यावर खटला दाखल करून त्यांचे सदस्यपद रद्द केले आहे. आता अध्यक्षांना लक्ष्य केले आहे.पिसे यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल झाला आहे. 24 रोजी याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने प्रांताधिकार्‍यांना माघारी फिरावे लागले. यावेळी सदस्य उपस्थित होते. 

प्रांताधिकार्‍यांनी 24 रोजी अविश्‍वासावर मतदान घेण्याचे जाहीर  केले होते. याविरोधात पिसे यांनी बंगळूर उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती आदेश बजावला.हिंडलगा ग्रा. पं. मध्ये अविश्‍वास ठरावाचे राजकारण मागील सहा महिन्यांपासून  रंगले आहे. समितीला आव्हान देण्यासाठी भाजप व काँग्रेसचे सदस्य एकत्र आले आहेत. त्यांच्याकडून समितीला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उपाध्यक्षांचे सदस्यत्व यापूर्वीच रद्द झाले आहे. अध्यक्षावर अविश्‍वास ठराव दाखल झाला आहे. यामध्ये गावातील विकासकामे ठप्प झाली आहेत. कामासाठी नागरिकांना पंचायतीकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

ग्रा. पं. चा विस्तार फार मोठा आहे. यामुळे समस्यादेखील अधिक आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण  केले आहे. पाण्याअभावी नागरिकांची अडचण होत आहे. ग्रा. पं. कडून दहा दिवसातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना खासगी टँकर्सचा आधार घ्यावा लागत आहे. लोकनियुक्त सदस्यांच्या हातात कारभार नसल्याने कर्मचार्‍यांवर वचक नसून ठिकठिकाणी कचरा साचून राहिला आहे. गावच्या मुख्य रस्त्यावर कचरा साचला आहे. गावच्या राजकारणात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.