Mon, Jun 17, 2019 18:33होमपेज › Belgaon › ...किती सोसायची झळ?

...किती सोसायची झळ?

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:41PMबेळगाव : प्रतिनिधी

पेट्रोल व डिझेल दराची सातत्याने होणारी वाढ बेळगावकरांसाठी संतापजनक ठरली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे. धावत्या शहराबरोबर धावण्यासाठी वाहन वापरण्याखेरीज पर्याय नाही. यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी असल्याने खासगी वाहनांचा वापर वाढत चालला आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीची मोठी झळ शहरवासीयांना बसत आहे. याबाबत विविध स्तरांतून नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पेट्रोल व डिझेल दरवाढ 14 मे पासून सुरुच आहे. मागील दहा दिवसापासून दरवाढीची मालिका सुरूच आहे. सध्या बेळगावात पेट्रोल प्रतिलिटर 78.76 रु. तर डिझेल 69.76 रु. इतका दर आहे.  सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आहे. अमरावतीत 86.22 रु. इतका दर आहे. केएसआरटीसीच्या बसेसखेरीज शहरात अन्य कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. अनेकांना कामाची वेळ आणि बसची सांगड घालणे शक्य नाही. नोकरदारांपासून ते विद्यार्थीवर्गापर्यंत प्रत्येकाला खासगी वाहनांचा वापर करावा लागला आहे. महिलावर्गाकडूनही वाहनांचा वापर होतो. रस्त्यावर पादचारी कमी. वाहनांची संख्या अधिक दिसते. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे वाहनधारकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सामान्यांचे तर कंबरडेच मोडणार आहे. सरकार यावर अंकुश आणण्यास अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.