Sun, Mar 24, 2019 17:10होमपेज › Belgaon › ग्रामीण-दक्षिणची ‘हाय व्होल्टेज’ झुंज

ग्रामीण-दक्षिणची ‘हाय व्होल्टेज’ झुंज

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:12AMबेळगाव : प्रतिनिधी

म.  ए. समितीच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या असणार्‍या बेळगाव ग्रामीण आणि दक्षिण मतदारसंघात ‘हाय व्होल्टेज’ प्रचार रंगला आहे. प्रत्येक उमेदवारांने मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न चालविल्याने वातावरण तापले आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात बड्या नेत्यांच्या सभांनी वातावरण  ढवळून निघाले आहे. दोन्ही ठिकाणी  म. ए. समिती, काँग्रेस, भाजप अशी तिरंगी लढत आहे. तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली आहे. एकेक मतावर डोळा ठेवून प्रचार यंत्रणा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात थेट मतदारांशी थेट संपर्कानंतर दुसर्‍या टप्प्यात बड्या नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या आहेत. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रामीममध्ये म. ए. समितीला निसटता पराभव स्वीकारावा लागला. याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न म. ए. समितीकडून सुरू आहेत. समर्पण वृतीने राबणार्‍या कार्यकर्त्यांची फौज मनोहर किणेकर यांच्या पाठीशी असून त्या जोरावर त्यांनी यावेळी विजय संपादन करण्याचा प्रयत्न चालविला आहे.ग्रामीणच्या प्रचारासाठी प्रा. एन. डी. पाटील यांच्या दोन दिवस सभा घेण्यात आल्या. प्रा. मधुकर पाटील यांच्या तुफानी वक्तृत्वानी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारपर्यंत दररोज सभा होणार आहेत.

काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मागील वर्षभर निवडणुकीची तयारी चालविली आहे. त्यांच्या प्रचारासाठी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, डी. के. शिवकुमार यांच्या सभा झाल्या. त्यांनी थेट मतदारांच्या संपर्कावर भर दिला आहे.भाजपचे उमेदवार आ. संजय पाटील यांनीदेखील प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, स्मृती इराणी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या सभा घेवून वातावरण तापविले आहे. मागील दहा वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर त्यांनी मते मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

दक्षिणमध्ये चुरस

म. ए. समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे हे सीमाप्रश्नाच्या लढ्यातील हे लढावू नेते. त्यांनी आजवर केलेल्या कामाच्या जोरावर ते मतदारासमोर जात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रा. एन. डी. पाटील, प्रा. मधुकर पाटील यांच्या सभा सुरू आहेत. येत्या काळात शिवसेनेचे आ. प्रकाश आबीटकर, अ‍ॅड. के. डी. शिंदे, प्राचार्य आनंद मेणसे यांच्या सभा होणार आहेत. एक सामान्य कामगार ते नेता अशी त्यांची राजकीय कारकीर्द असून त्यांना मतदारातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले बंडखोर उमेदवार किरण सायनाक यांना विरोध वाढत असून अनेक ठिकाणी त्यांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. सुरेश हुंदरे स्मृतिमंचने मरगाळे यांच्या पाठीशी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मरगाळेंना बळ मिळाले आहे.