होमपेज › Belgaon › हेस्कॉमचे नुकसान ४० लाखांवर

हेस्कॉमचे नुकसान ४० लाखांवर

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:49AMबेळगाव : प्रतिनिधी

चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने हेस्कॉमचे बेळगाव व खानापूर तालुक्यात मिळून 40 लाख रु.च्या घरात नुकसान झाले आहे. या पावसाच्या पहिल्याच फटक्यात 22 विद्युत खांब निकामी झाल्याची घटना घडली. खांब व ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्याने शहर, उपनगर व ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

शुक्रवार 4  व शनिवा 5 रोजी झालेल्या वळीवाच्या पावसाने शहर, उपनगरात विविध ठिकाणी वृक्ष, फांद्या पडल्याने बारा वीज खांबांचे नुकसान झाले. वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. आंबेडकरनगर अनगोळ येथील ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले होते. यामुळे शहराबरोबरच उपनगरातही शनिवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. पावसामुळे आंबेडकरनगर, आदर्शनगर,  चन्नम्मानगर, गुरुप्रसाद कॉलनी, भाग्यनगरात  फांद्या वीजवाहिनीवर   पडून  एकूण  12 खांब  कोसळले. या भागात फांद्या हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हेस्कॉम कर्मचारी करत होते. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश आले नाही. या काळात  संध्याकाळपर्यंत या भागात अनियमित वीजपुरवठा सुरू होता. तालुक्यात आतापर्यर्ंत 80 खांब व 30 ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्याची नोंद आहे. 

दरवर्षी हेस्कॉम कर्मचारी पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटण्याची मोहीत हाती घेतात. फांद्या वाहिनीवर पडून नुकसान टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. मात्र, अजूनही मोहीम सुरू नसल्याने याचा फटका हेस्कॉमला बसला.

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यालगतचे वृक्ष पडून वीजवाहिन्या तुटण्याबरोबर अपघातांच्या घटना ठिकठिकाणी घडल्या.  दरवर्षी जीर्ण वृक्ष  पडून वीजवाहिन्या  तुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे  गावांचा वीजपुरवठा बंद होतोे. जुनाट आणि धोकादायक झाडे न हटविल्याने दरवर्षीच अशी स्थिती निर्माण होते. याकरिता पावसाळ्याआधीच जुनाट वृक्ष हटविण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

खानापूर तालुका जंगलव्याप्त असल्याने वृक्ष पडून नुकसानीच्या अनेक घटना दरवर्षी घडतात. बहुतांश ठिकाणी वीजवाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. त्यामुळे फांद्या पडून शॉर्टसर्किटमुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रकार यंदाही घडले.   यात  हेस्कॉमचे 40 खांब व 18 ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले. जंगलव्याप्त भागातून वीजवाहिन्या घातल्यामुळे वनखाते झाडे तोडण्यास आक्षेप घेते. यामुळे हेसनकॉमला काही करता येत नाही.