Thu, May 23, 2019 15:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मतदारांकडून उमेदवाराला सव्वा रुपयाची मदत

मतदारांकडून उमेदवाराला सव्वा रुपयाची मदत

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 9:04PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुकीसाठी उमेदवारांना मतदार स्वतः मदत करत. सव्वा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत मदत करण्यात येत असे. तो काळ वेगळा होता. जनता नेत्याच्या पाठिशी ठाम उभी रहात असे आता काळ बदलला आहे...

माजी आमदार बी. आय. पाटील सांगत होते. स्वतःची पहिली निवडणूक दीड लाख रुपये खर्चात झाली, अशी माहितीही त्यांनी दिली.

पाटील म्हणाले, निवडणुकीचा तो काळ वेगळा होता. प्रत्येक मतदाराला मीच उमेदवार असल्याचे त्याकाळी वाटत होते. घरातली भाजी-भाकरी पिशवीत बांधून घेवून मतदार प्रचारात सहभागी होत. कधी सायकलीवरून रणरणत्या उन्हात गावे पालथी घालण्यात येत. मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येई. त्यांनी दिलेला चहा, भडंग खावून दुसरे गाव गाठण्यात येई. 

अशा प्रकारे 1981 माझी पहिली निवडणूक केवळ दीड लाख रुपये खर्चात पार पडली. त्यापैकी अधिक पैसा जनतेनेच वर्गणी काढून दिला, अशी माहिती माजी आ. बी. आय. पाटील यांनी दिली. उचगाव विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून येण्याचा पराक्रम त्यांनी केला. त्या काळातील निवडणूक प्रचारात आणि सध्याच्या प्रचारात जमिन-अस्मानाचा फरक पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आ. बी. आय. पाटील यांची सीमाभागात बी. आय. या नावानेच ओळख आहे. अतिशय रांगडे व्यक्तिमत्त्व. बेळगावी भाषेची नजाकत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेली आढळते.  बी. आय. पाटील हे तालुका विकास बोर्डाचे चेअरमन असताना तालुका म. ए. समितीने 1981 च्या विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.

त्यानंतर त्यांनी म. ए. समिती कार्यकर्ते व नेत्यांच्या मदतीने मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत असत. गावागावात बैठका घेण्यात येत. राजकीय पक्षांचे उमेदवार अनेक गावांमध्ये प्रचाराला जाण्यासही घाबरत असत. गावागावातील मराठी भाषिकांची एकजूट अभेद स्वरुपाची होती. सध्या निवडणुकीचा काळ म्हणून दारू, मटण, जेवणावळी यांचा सुकाळ झालेला आढळून येतो. पांढर्‍या कपड्यातील कार्यकर्ते उंची वाहनातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, 1981 च्या दरम्यान याचा अभाव होता. संपर्काची साधने नव्हती. दुचाकी, चारचाकी वाहने खूप कमी होती. यामुळे सायकल घेवून प्रचार करावा लागत  असे. बहुतांश कार्यकर्ते दिवसभराची शिदोरी घेऊन प्रचारात सहभागी होत असत.