Sun, Nov 18, 2018 07:05होमपेज › Belgaon › हेल्मेट सक्‍तीतून मुक्‍ती?

हेल्मेट सक्‍तीतून मुक्‍ती?

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 8:52PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सुमारे दहा महिन्यांपूर्वी शहरात  वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीला जोरदार सुरुवात करण्यात आली होती. मात्र, तीन महिन्यापूर्वी मुख्य सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर यामध्ये शिथिलता दिसून येत आहे. यामुळे हेल्मेट सक्तीतून मुक्ती असे म्हणण्याची वेळ आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांच्या आदेशावरून हेल्मेटसक्तीला जोर देण्यात आला होता. सुमारे सहा महिने कडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून यामध्ये शिथिलता दिसून येत आहे. यामुळे बेळगाव पोलिसांना पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीची आठवण करून देण्याची वेळ आली आहे.

शहरात प्रमुख सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्यास संबंधित वाहनधारकांच्या नोटीस बजाविण्यात येत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, याचे काटेकोर पालन होते का, हादेखील चिंतेचा विषय बनला आहे. अनेकवेळा अवैध वाहतुकीकडे रहदारी पोलिसांकडूनही दुर्लक्ष कले जाते. यामुळे अवैध वाहतूकीने देखील जोर घेतला आहे. 

शहरातील यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौैक, उभा मारूती, गोवावेस सर्कल, चन्नम्मा सर्कल, अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, कोल्हापूर सर्कल, गोगटे सर्कल, अरगन तलाव, गणेशपूर रोड आदी ठिकाणी विनाहेल्मेट धारक  तसेच कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे. यातील काहीच ठिकाणी तेही पोलिसांना आठवण आल्यानंतर तपासणीला जोर दिला जातो.   वाहतूक पोलिसांचे हेल्मेटसक्तीकडे दुर्लक्ष असल्याने वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.

शहरात यापूर्वी हेल्मेट सक्ती केल्यानंतर अनेकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत होती. मात्र, सध्या यामध्ये शिथिलता आल्यामुळे ठरावीक वाहनधारकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत आहे. हेल्मेट सक्तीनंतर वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यामुळे प्रत्येकजण वाहनांची कागदपत्रे जवळ ठेवत होते. तसेच प्रत्येकाच्या डोकीवर हेल्मेटही दिसत होते. मात्र, सध्यस्थितीत असे होताना दिसत नाही.