Wed, Apr 24, 2019 19:40होमपेज › Belgaon › मार्चच्या तोंडावरच का होते सक्‍ती?

मार्चच्या तोंडावरच का होते सक्‍ती?

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 18 2018 8:54PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात 20 वर्षात 15 हून अधिक वेळा हेल्मेटसक्तीचा बडगा उगारण्यात आला. गेल्या वर्षीही याच प्रकारे चार महिने सक्ती झाली. आता पुन्हा  सक्‍तीची अंमलबजावणी सुरू होत आहे. मार्चअखेर टार्गेटसाठी सक्ती का केली जाते, अशी शंका वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.

आठवडाभरात  अपघाती घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. एकाच दिवशी 9 अपघातात 6 दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्याने जीव गेला. हेल्मेटसक्तीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे. संपूर्ण देशातच सक्ती असताना याची अनेक राज्यांत अंमलबजावणी केली जात नाही. कर्नाटकातही बंगळूर राजधानी वगळता अन्य शहरात सक्ती वार्‍यावरची ठरली आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अधूनमधून सक्तीचे वारे वाहू लागते. पोलिस प्रशासनाकडून सक्तीसंदर्भात कारवाईची माहिती जाहीर करण्यात येते. काही काळानंतर सक्तीचे वारे विरते. पुन्हा काही महिन्यांनी सक्तीचे नवे वादळ सुरू होते.

पोलिस प्रशासन विविध प्रकारे दंड गोळा करीत असते. यामधून शासनाला महसूल मिळतो. यामुळेच शासन प्रत्येकवर्षी सरकारी खात्याला महसूल संकलनाचे टार्गेट देत असते. यामध्ये पोलिस प्रशासनालाही वर्षाकाठी दंडात्मक रूपाने महसूल मिळावा, म्हणून शासनाकडून पडद्याआडून सूचना मिळालेल्या असतात. मार्च अखेरपयर्ंत टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी विविध कारवाईतून दंड वसूल करतात. पोलिसांना हेल्मेटसक्तीची नव्याने जाग आली आहे. 27 पासून  सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. आधी जनजागृती, नंतर दंड या भूमिकेतून पुढे विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. आगामी अडीच महिने काटेकोर अंमलबजावणीची शक्यता आहे. मार्चअखेरपयंर्ंत प्रशासन दंड वसुलीसाठी सज्ज झाले आहे.  सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीस्वाराने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. हेल्मेटचा दर्जाही महत्त्वाचा आहे.  आयएसआय मार्कच्या हेल्मेटच्या किमती जास्त असल्यामुळे दुचाकी चालक दिल्लीमेड हेल्मेट खरेदी करतात. त्याचे त्रास उन्हाळ्यात सहन करावे लागतात. उन्हाळ्याच्या तोंडावर होणारी सक्ती सर्वांनाच तापदायक वाटत असते. पण टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिस मार्चच्या तोंडावरच सक्तीचा बडगा उचलतात.

लाखोंनी खरेदी केले साधे हेल्मेट, याला जबाबदार कोण?

बेळगाव : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देशभरात दुचाकी चालकाना व मागे बसणार्‍यांना हेल्मटची सक्‍ती अंमलात आणण्याचा आदेश बजावला. त्यावेळीच हेल्मेट आयएसआय मार्कचे असण्याची अट घातली होती.

त्यावेळी कर्नाटकासह प्रमुख शहरामध्ये रस्त्याशेजारी हेल्मेटसचे स्टॉल्स मांडून विनाआयएसआय हेल्मेटची लक्षणीय विक्री झाली. पोलिसानी अशा विक्रेत्यावर कारवाई केली नाही. उलट पोलिसच त्या विक्रेत्याना रहदारीला अडथळा होऊ नये अशा ठिकाणी बसून विनाआयएसआय हेल्मेट विक्रीची मुभा दिली. पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून दुचाकीस्वारांनी डोक्यावर ठेवण्यासाठी हेल्मेट खरेदी केली. आता राज्य वाहतूक खात्याचे आयुक्‍त बी.दयानंद यानी हेल्मेट आयएसआय मार्कचेच हवेत. विनाआयएसआय  चालणार नाही, असा नियम अंमलात आणला आहे. अशा हेल्मेटची विक्री करणार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.