Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › हेब्बाळकरांच्या मंत्रिपदाला जारकीहोळ्ळींची आडकाठी

हेब्बाळकरांच्या मंत्रिपदाला जारकीहोळ्ळींची आडकाठी

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:22PMबेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मंत्रिपदाला जारकीहोळ्ळी बंधू आडकाठी आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बेळगाव जिल्ह्याला दोनच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असल्यामुळे एक पद जारकीहोळ्ळी बंधंपैकी एकट्याला मिळेल. दुसरे पद हेब्बाळकरना मिळण्याची शक्यता आहे. तथापि, प्रप्रथम आमदार झालेल्या हेब्बाळकरांना मंत्रिपद दिले जाऊ नये, दोन आणि तीन वेळा आमदार असलेले रमेश आणि सतीश या दोन्ही जारकीहोळी बंधूंना दोन मंत्रिपदे दिली जावीत, अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे. त्यातच हेब्बाळकरांना मंत्रिपद दिल्यास आम्हाला मंत्रिपद नको, असा पवित्र जारकीहोळ्ळी बंधूंनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जिल्ह्याला दोनच मंत्रिपदे असली तरी ती कोटा पद्धतीनुसार एक पद मागासवर्गीय आणि दुसरे पद लिंगायत  आमदाराला जाणार आहे. त्यानुसार एक मंत्रिपद पुन्हा जारकीहोळी बंधूंकडे जाणे निश्‍चित आहे. फक्त रमेश की सतीश जारकीहोळी इतकेच निश्चित होणे बाकी आहे. दोन्ही बंधू गेल्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात आलटून-पालटून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तथापि, दोघांपैकी कुणाचेही नाव अंतिम यादीत आले तरी ी दुसरे मंत्रिपद हेब्बाळकरांना दिले जाऊ नये, यासाठी जारकीहोळी बंधूंनी लॉबिंग सुरू केले आहे. दुसरे पद लिंगायत आमदाराला द्यायचे असल्यास बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी किंवा चिक्कोडी-सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांची निवड करावी, असे जारकीहोळ्ळी बंधूंचे म्हणणे असल्याच समजते.

काँग्रेस-निजद युतीच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 34 मंत्री राहू शकतात. एकूण 224 आमदारांच्या विधानसभेत मंत्रिमंडळाचा आकार 15 टक्केच राहू शकतो. त्यानुसार 34 जणांना संधी मिळणार आहे. त्यात काँग्रेसने 21 मंत्रिपदांची मागणी केली आहे. तर निजदला 13 मंत्रिपदे देऊ केली आहेत. अर्थात त्याला अजूनही निजदची संमती मिळालेली नाही. निजदने आणखी मंत्रिपदांची मागणी केल्यास काँग्रेसची पदे कमी होऊ शकतात.

मंत्रिपदच नको

लक्ष्मी हेब्बाळकरांना मंत्रिपद देणार असाल, तर मला मंत्रिपदच नको अशी भूमिका सतीश जारकीहोळ्ळींनी घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बेळगाव जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सतीश जारकीहोळ्ळींना हेब्बाळकरांचा प्रभाव रोखायचा आहे. त्यातूनच अंतर्गत विरोध आहे.