Wed, Jun 26, 2019 17:37होमपेज › Belgaon › चिकनगुनियाबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क

चिकनगुनियाबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 10 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव, भारतनगर, खासबागसहित अन्य भागात चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावारण पसरले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने याची दक्षता म्हणून सोमवारी (दि. 11) वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक बोलाविली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. 

पावसाळ्याला सुरुवात होताच दूषित पाण्यातून रोगराई पसरते. प्रतिवर्षी जिल्हा आरोग्य विभागातर्फे याची दक्षता म्हणून औषध फवारणी तसेच जागृती अभियान राबविण्यात येते. मात्र, यावेळी आरोग्य विभाग व मनपाचे दुर्लक्ष असल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. वडगावसह अन्य भागात चिकनगुनियाचे 50 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. 

वडगावमध्ये जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात अनेक नागरिक तपासणीसाठी येत आहेत. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांना सोडून दिले जात आहे. या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. 

चिकनगुनियाची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून या भागातील गल्लीबोळात, घरांतून जागृती अभियान राबविले जात आहे. घराघरातून साठवून ठेवलेल्या पाण्याची तपासणी केली जात आहे. डगावातून बळ्ळारी नाला जातो. हे डास उत्पत्तीचे प्रमुख केंद्र मानले जात आहे. शहरातील ड्रेनेज पाणी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. 

वडगाव, खासबाग, भारतनगर, शांतीनगर, मलप्रभानगर, मंगाईनगर, देवांगनगर, विष्णू गल्ली आदी भागात चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. या भागात मूलभूत सुविधांची वानवा आहे. येथील विकासाकडे मनपाचे दुर्लक्ष असल्याने आरोग्य प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.