होमपेज › Belgaon › लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र तरीही रुग्ण उपचाराविना!

लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र तरीही रुग्ण उपचाराविना!

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 8:35PMरायबाग : प्रतिनिधी

रायबाग तालुक्यातील 5 लाख लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आहेत. पण या सर्वांना आरोग्य केंद्राचा लाभ मिळत नाही. तालुक्यात एकूण 90 सरकारी इस्पितळे, 6 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 2 समुदाय आरोग्य केंद्रे, 44 आरोग्य उपकेंद्रे, 1 मोबाईल हेल्थ घटक आहेत. गरीब रुग्णांना लाभ व्हा, या उद्देशाने सरकारने अनेक नव्या योजना जारी केल्या आहेत. परंतु या योजना गरीब रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप केला जात आहे.

रायबाग तालुक्याची लोकसंख्या 4,88,470 आहे. यामध्ये 5 वर्षाखालील मुलांची संख्या 58,677 आहे. एवढी लोकसंख्या असूनही येथे फक्त 10 सरकारी इस्पितळे कार्यरत आहेत. रायबाग शहरात एक इस्पितळ, कुडची येथे एक इस्पितळ, मुगळखोड येथे समुदाय आरोग्य केंद्र, ब्याकूड, चिंचली, हारुगेरी, मोरब, नसलापूर व हिडकल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हंदीगुंद येथे संचारी आरोग्य केंद्र आहे.
सरकारने प्रत्येक भागात लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राची रचना केली आहे. नियमानुसार 25 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक केंद्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार तालुक्यात 19 प्राथमिक आरोग्य केंद्रे असायला हवीत. परंतु फक्त 6 प्राथमिक आरोग्य केंद्रे म्हणजे 50 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामुळे गरीब रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचत नाही.

येथे असणार्‍या आरोग्य केंद्रापैकी अनेक आरोग्य केंद्रात वैद्य नाहीत. रायबाग सार्वजनिक इस्पितळातही वैद्यांची कमतरता आहे. एमबीबीएस तज्ज्ञ येथे कोठेही नाहीत. काही ठिकाणी भाडेतत्त्वावर वैद्यांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक इस्पितळात आधुनिक यंत्रोपकरणांची कमतरता आहे. तालुक्यातील 44 आरोग्य उपकेंद्रात 45 महिला कर्मचारी व 30 पुरुष कर्मचारी सेवा बजावत आहेत. गरीब रुग्णांसाठी आधुनिक आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे येथील रुग्ण चिकोडी, बेळगाव व मिरज येथे उपचारासाठी जातात. यासाठी सर्व परिपूर्ण सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी कोळीगुड्ड यल्पारट्टी येथे वैद्य पद मंजूर झाले आहे. येथे वैद्याधिकारी व कर्मचारीही येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून या केंद्राचा बदल होणार आहे.  - डॉ. आप्पासाहेब नरट्टी, जिल्हा आरोग्याधिकारी, बेळगाव

तालुक्यातील आवश्यक प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.      - डॉ. एम. एस. कोप्पद, तालुका वैद्याधिकारी