Tue, Jun 25, 2019 13:43होमपेज › Belgaon › ‘त्याने’ दिले 45 कुटुंबांना जीवदान

‘त्याने’ दिले 45 कुटुंबांना जीवदान

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 11:22PMबंगळूर : प्रतिनिधी

भूस्खलन होणार असल्याचा  संशय मुक्कंदुरू (ता. सोमवारपेठ)  गावातील एका तरुणाने ग्रामस्थांना पोचविल्याने तेथील 45 कुटुंबांना जीवदान मिळाले आहे. कोडगू जिल्ह्यातील एम्मेताळु गावात महापूर व भूस्खलनाने घरे भुईसपाट होऊन अनेक जण बेघर झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे 45 कुटुंबांची दैन्यावस्था झाली आहे. मुक्कंदुरू, मुक्कोडलु, मुटलु, हम्मीयाल, तंतिपालसह 30 हून अधिक गावे अतिवृष्टीमुळे नेस्तनाबूत झाली आहेत. भूस्खलन होणार असल्याचा  दाट संशय 15 ऑगस्टच्या रात्री मुक्कंदुरू  येथील संदेश नामक तरुणाला आल्याने त्याने रातोरात शेजारील कुटुंबांना सावध राहण्यास सांगितले. त्यामुळे भयभीत नागरिकांनी आपले मूळ ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. गुरुवारी दुपारपर्यंत 45 कुटुंबांनी स्थलांतर केले होते. त्यानंतर सायंकाळी भूस्खलन झाले.

...असे केले स्थलांतर

संदेश तरुणाने व्यक्त केलेल्या  संशयावरून स्थलांतराची तयारी चालविलेल्या कुटुंबांतील काही वृध्द मंडळींना मोटारसायकलीवरून मुक्कंदुरू गावी नेण्यात आले. मध्यमवयीन पुरुष, महिला व मुले  यांनी एम्मेताळु ते मुक्कंदुरूपर्यंत 3 कि.मी. पायपीट केली. तेथून 43 कुटुंबांना वाहनातून मडिकेरीला नेण्यात आले. एम्मेताळे गावातील जवळजवळ सर्वच कुटुंबांनी जनावरे, पाळीव प्राण्यांसह  सुरक्षितस्थळी स्थलांतर केल्याने गावात स्मशानशांतता आहे.

सकलेशपूरला 200 कोटींचे नुकसान

जिल्ह्याच्या सकलेशपूर येथे अतिवृष्टी व महापुरामुळे स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल खात्याने केलेल्या पाहणीनुसार सुमारे 200 कोेटींचे नुकसान झाल्याचे समजून येते.

माझ्या मुलांचे पुढे कसे?: रामण्णा

9 लाख रु.खर्चून नवे घर बांधले होते. गृहप्रवेशासाठी मुहूर्त ठरवत असतानाच भूस्खलन होऊन जुन्या घराबरोबर नवे घरही नेस्तनाबूत झाले. आम्ही आता राहायचे कोठे?  मला दोन मुले, मुलगी आहे. त्यांच्या भावितव्याचे काय, असा प्रश्‍न एम्मेताळे येथील शेतकरी रामण्णा यांनी केला.