होमपेज › Belgaon › ‘जय शिवाजी’ची अ‍ॅलर्जी

‘जय शिवाजी’ची अ‍ॅलर्जी

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रशासनाकडून मराठी भाषेचा आणि भाषिकांचा सातत्याने द्वेष करण्यात येतो. आता तर अधिकार्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचीही अ‍ॅलर्जी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने म. ए. समिती उमेदवारांच्या ‘जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेल्या जाहिराती प्रकाशित करण्यास सलग दुसर्‍या दिवशी परवानगी नाकारली. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकात शासकीय स्तरावर शिवजयंती साजरी केली जाते. तरीही राष्ट्रपुरुषाच्या नावाला आक्षेप घेऊन जाहिरातींवर बंदी घालण्यात आली. शिवाय तो उल्लेख काढण्याची मुभा देण्यासही नकार देण्यात आला. त्यामुळे प्रशासनाचा शिवाजी महाराजांच्या विषयी असणारा द्वेष स्पष्ट झाला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली. परकीय सत्तेशी झुंज देवून संपूर्ण देशवासियांमध्ये देशप्रेम जागृत केले. त्यामुळे त्यांचा आदर संपूर्ण जगभर करण्यात येतो. मात्र, कानडीप्रेमाने आंधळे बनलेल्या प्रशासनातील काही अधिकार्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख खुपला आहे. बेळगाव दक्षिणचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांची जाहिरात प्रकाशित करण्यास परवानगी नाकारली. म. ए. समितीच्या उमेदवारांना डिवचण्यासाठीच ‘जय भवानी, जय शिवाजी’ हा आक्षेप घेतला, असे समिती नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठी भाषिकात संताप आहे.

बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे. मराठी भाषिकांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेचा जयघोष करण्यात येतो. यातून मराठी बांधवांना लढण्याचे, झुंजण्याचे बळ मिळते. सीमालढ्यात याचा सतत उल्लेख केला जातो. मात्र यावरच आक्षेप घेण्याचे कुटील कारस्थान अधिकार्‍यांनी केले आहे, अशी टीका होत आहे. ऐनवेळी शेवटच्या दोन दिवसांत समिती उमेदवारांना जाहिरातींपासून वंचित ठेवण्यात आले.

आदेश नेमका काय?

शेवटचे दोन दिवस जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागेल, असे बैठकीद्वारे सांगण्यात आले. मात्र मंजुरीसाठी दिलेली जाहिरात स्वीकारणार किंवा फेटाळणार हे दोनच पर्याय कसे काय असू शकतात? आक्षेप असलाच तर तो मजकूर वगळून जाहिराती प्रसिद्ध करण्याचा पर्याय का नाही, हा प्रश्‍न आहे. तसा प्रश्‍न समिती उमेदवारांच्या सहायकांनी उपस्थितही केला. मात्र त्यांना उत्तर देण्यात आले नाही.