Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Belgaon › हानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त

हानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:43PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दुभत्या जनावरांना हानीकारक ठरणार्‍या बंदी असलेल्या ऑक्स्टोसीन औषधांची विक्री बेळगावातील कोनवाळ गल्लीत केली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर औषध विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाने कोनवाळ गल्ली येथील गंगाधर सिद्धाप्पा गवळी याच्याकडून 73 हजार रु. किमतीची हानीकारक औषधे जप्त केली आहेत, अशी माहिती कायदा सुव्यवस्था विभागाच्या पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

यावेळी पुढे बोलताना लाटकर म्हणाल्या, हानीकारक ऑक्स्टोसीन औषधांचे दुष्परिणाम जनावरांबरोबरच माणसांवरही होत असतात. ज्यादा दुधाच्या आशेने ती औषधे दुभत्या जनावरांना दिली जातात; मात्र त्या औषधांमुळे जनावरांना कॅन्सरचा धोका असतो. त्याचबरोबर हानीकारक औषधे घेतलेल्या जनावरांच्या दुधाच्या सेवनामुळे छोट्या मुलांना कावीळ तसेच मेंदूचा रक्‍तपुरवठा कमी होतो. पुरुषांमधील रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होते. स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. स्त्रियांना गर्भाशय आणि स्तनाचा रोग संभवतो. यामुळे केंद्र सरकारने या ऑक्स्टोसीन औषधे जनावरांसाठी वापरणे बंद केली आहेत. अशा वेळी कोनवाळ गल्लीत सरेआमपणे ती औषधे विक्री केली जात होती.

गेल्या 6 महिन्यांपासून पाळत ठेवून कोनवाळ गल्ली येथून ती हानीकारक औषधे जप्त करण्यात आली आहेत. सदर औषधे महाराष्ट्रातून बेळगावात आणली जात होती. त्यानंतर येथील गवळ्यांना औषधे बेकायदेशीररित्या विक्री केली जात होती. ड्रग्ज कॉस्मॉटीक कायद्यांतर्गत सदर कारवाई करण्यात आली आहे. 293 ऑक्स्टोसीन औषध बाटल्या ताब्यात घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.