Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Belgaon › हालशुगरला ऊर्जितावस्था आणण्याचे मोठे आव्हान

हालशुगरला ऊर्जितावस्था आणण्याचे मोठे आव्हान

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:03AMनिपाणी : विठ्ठल नाईक

येथील सीमाभागातील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांना एक आशेचे किरण आहे. निपाणीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी कै. बाबुराव पाटील-बुदिहाळकर यांनी कारखान्याची स्थापना केली. अनेक वर्षे शेतकर्‍यांना एकप्रकारे वरदान आणि संजीवनी ठरलेल्या कारखान्याची अवस्था आज बिकट आहे. सुमारे 264 कोटी रु. कर्ज हालशुगरवर असून नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांसमोर कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

माजी अध्यक्ष प्रा. सुभाष जोशी यांनी हालसिध्दनाथ साखर कारखाना कार्यस्थळावर समांतर कारखाना उभा करण्यासह को-जनरेशन प्रकल्प उभारला. गत गाळप हंगामावेळी कर्नाटकात 3151 रु. प्रतिटन उच्चांकी दर जाहीर केला. नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या उसाला जाहीर केल्याप्रमाणे बिल देण्यात आले. त्यानंतर गाळप केलेल्या उसाला प्रतिटन 2500 रु.प्रमाणे दर देण्यात आला. पण फेब्रुवारीतील गाळप उसाची बिले देणे शक्य झाले नाही.

कारखान्याची स्थिती आणि शेतकर्‍यांच्या बिलासह कामगारांचे पगार थकित झाल्याने विधानसभा निवडणूक काळात आठ संचालक भाजपप्रणित जोल्‍ले गटाला मिळून कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न झाले.  प्रा. सुभाष जोशी यांनी अध्यक्षपदाचा व अनिता पाटील यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरु झाल्या.

जोल्‍लेंकडून सहकार्य

आठ संचालकांमध्ये नूतन अध्यक्ष म्हणून चंद्रकांत कोठीवाले तर उपाध्यक्ष म्हणून एम. पी. पाटील यांची निवड करण्यात आली. सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍ले यांनी सभासद व शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा घेऊन आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाल्यास कारखाना उत्तमरित्या चालवू, असे सांगितले.

आता कारखान्याला आर्थिक आरिष्टातून वाचविण्यासाठी नूतन अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या नेतृत्त्वाखाली संचालकांनी खा. डॉ. प्रभाकर कोरे, माजी खासदार व बीडीसीसी बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. 

गाळप क्षमता वाढणार

नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता वाढवून यंदाच्या गळीत हंगामासाठी चांगल्या प्रतीचा ऊस गाळप करण्यासाठीही प्रयत्न राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी सांगितले. आता आगामी निवडणुकीत कारखान्यावर कोणत्या गटाची सत्ता येणार, यावरही बरेच काही अवलंबून आहे. हालसिध्दनाथ साखर कारखाना शेतकर्‍यांच्या हितासाठी अविरत सुरु रहावा, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.