Mon, Mar 25, 2019 09:17होमपेज › Belgaon › वाद्यांचा प्रवास ‘हलगी ते डॉल्बी’

वाद्यांचा प्रवास ‘हलगी ते डॉल्बी’

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 28 2018 10:23PMबेळगाव : प्रतिनिधी

गणेशोत्सव म्हटले की उत्साहाला उधाण येते. लाडक्या गणरायाचे स्वागत थाटात करण्यात येते. पण काळाच्या ओघात वाद्यांमध्येही लक्षणीय बदल झाला असून मंगलवाद्ये मागे पडून रणवाद्यांना पसंती मिळत आहे. गणेशोत्सवात हलगी ते डॉल्बी असा वाद्यांचा प्रवास पाहावयास मिळतो.

उत्सवाच्या पहिल्या टप्प्यात पारंपारिक वाद्यांनाच पसंती देण्यात येत असे. आगमनावेळी सनई चौघड्याचा सर्रास वापर करण्यात येई. आरतीच्यावेळीदेखील सनई चौघडे वाजविण्यात येत. यातून मंगलवातावरण निर्माण होत असे. गणेशभक्तीचा दरवळ सर्वत्र पसरत असे. यासाठी पानविडा आणि किरकोळ खर्च येत असे. पारंपारिक व्यवसाय जपणारे वाजंत्री यामध्ये रमलेले असत. तर विसर्जनाच्या मिरवणुकीत हलगीचा ठेका घुमत असे. यामध्ये युवक तल्लीन होउन नाचत असत. काही वेळी गुलाल, चुरमुरे यांचा वापर करण्यात येई.

त्यानंतर उत्सवामध्ये फरक पडत चालला. पारंपारिक वाद्ये कालबाह्य ठरू लागली. असे व्यवसाय करणारे अन्य व्यवसायात शिरू लागले. पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून अन्य मार्ग पत्करू लागले. परिणामी पारंपारिक वाद्ये काळाच्या ओघात कमी झाली.

बँडबाजाला पसंती मिळू लागली. आकर्षक पोषाख करून वेगवेगळ्या वाद्यावर लोकप्रिय गीतांच्या धून वाजविण्यावर भर देण्यात येऊ लागला. याची गणेशभक्तांना गोडी लागली. उडत्या चालीच्या मराठी, हिंदी गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्ते मुरडू लागले. गणेशाचे स्वागत अशा बँण्ड धूनच्या तालावर करण्यात येऊ लागले.विसर्जन मिरवणुकींना अशाच वाद्यांना  स्थान देण्यात येउ लागले. परिणामी मिरवणुकीला नवी लूक प्राप्त झाला.

अलिकडच्या काळात गणेशोत्सव म्हणजे डॉल्बी असे समीकरण निर्माण झाले आहे. अधिक क्षमतेच्या डॉल्बीवरून मंडळाची प्रतिष्ठा ठरू लागली. पाश्‍चात संगीताच्या तालावर डॉल्बीचा आवाज घुमू लागला. यासाठी हजारो रुपयाचा खर्च करण्यात येउ लागला.  यावर रात्री उशीरापर्यंत मिरवणुका निघू लागल्या. काळाच्या ओघात हालगी ते डॉल्बी असा प्रवास झाला आहे.