Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Belgaon › उद्यमबागमध्ये गारा, कडोलीत पाऊस

उद्यमबागमध्ये गारा, कडोलीत पाऊस

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 06 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम यंदा अधिकच जाणवत आहेत. कडक उन्हाळा असतानाही अधूनमधून  अचानक वळीव हजेरी लावत आहे. गुरुवारी दुपारनंतर बेळगाव शहर परिसरात ढगाळ वातावरण होऊन हलका शिडकावा झाला. कडोली, होनगा परिसरात सुमारे पाऊण तास  पावसाने झोडपून काढले. 

उद्यमबाग परिसरात दुपारी 3 च्या सुमारास वादळी वारे वाहत होते.  पाऊस पडेल असे वातावरण निर्माण झाले होते. पण केवळ गाराच पडल्या.  काही ठिकाणी उत्सुकतेने मुलांनी गारा गोळा केल्या. यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांची तारांबळ उडाली. 

गुरुवारी पहाटे सर्वत्र दाट धुके पडले होते. दुपारी उष्माही कडक होता. सायंकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. पावसाचे वातावरण असले तरी बेळगावला पावसाने हुलकावणी दिली. कडोली, जाफरवाडी, अगसगा, चलवेनट्टी, होनगा, काकती परिसराला पावसाने झोडपून काढले. अगसगा येथे काही घरांवरील पत्रे पावसामुळे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.  महसूल विभागाने नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

भर उन्हाळ्यात वारंवार वळीव पडल्याने अनेक पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. बेळगाव परिसरात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होतेे. पण सतत बदलणारे वातावरण मारक ठरत आहे. काजू उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात पहाटे थंडी तर दुपारच्या सत्रात तीव्र उष्मा असे वातावरण होते. अधूनमधून पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्याात पुन्हा वाढ झाली.

Tags : belgaum, belgaum news, Kadoli rain, Hail, udyam bagh,