Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Belgaon › इंग्रजीला २ तर भौतिकला ६ ग्रेस मार्क्स

इंग्रजीला २ तर भौतिकला ६ ग्रेस मार्क्स

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

बारावी परीक्षेत इंग्रजी आणि भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत चुका झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रेस मार्क देण्याचा निर्णय पदवीपूर्व शिक्षण खात्याने घेतला आहे. इंग्रजीसाठी 2 तर भौतिकशास्त्रसाठी विद्यार्थ्यांना 6 ग्रेस मार्क्स देण्यात येणार आहेत.

इंग्रजी प्रश्‍नपत्रिकेतील सक्तीच्या प्रश्‍नासाठी 2 गुण ग्रेस स्वरुपात देण्यात येणार आहेत. भौतिकशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना एक गुण ग्रेस तर ऐच्छिक प्रश्‍नाचे (चुकीचा प्रश्‍न) उत्तर देण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित 5 गुण ग्रेस स्वरुपात देण्यात येणार आहेत.

ग्रेस मार्क्स देण्याबाबत पदवीपूर्व शिक्षण खात्याने विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षक आणि प्रश्‍नपत्रिका तयार केलेल्या समिती सदस्यांची बैठक घेतली. यावेळी एकूण 8 गुण ग्रेस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यातआला. मूल्यमापकांना दिलेल्या स्कीम ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये ग्रेस मार्क देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. नागरिकांना याची माहिती मिळावी यासाठी वेबसाईटवर प्रश्‍नपत्रिका अपलोड केलेली आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी भौतिकशास्त्र तर शेवटच्या दिवशी इंग्रजी भाषेचा पेपर होता. व्याकरण आणि मुद्रणदोषाच्या काही चुका झाल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्‍नांचा अर्थ समजला नाही. यामुळे ग्रेस मार्क देण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी पदवीपूर्व शिक्षण खात्याकडे केली होती.

गुणपत्रिकेवरही उल्लेख

गेल्या वर्षापासून ग्रेस मार्क देण्यास नव्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा मंडळ जाहीरपणे ग्रेस मार्क्स देत आहे. देण्यात आलेले ग्रेस मार्क्स गुणपत्रिकेत छापण्यात येणार आहेत. यामुळे ग्रेस मार्क्समुळे उत्तीर्ण झाले की स्वप्रयत्नाने, हे स्पष्ट होणार आहे.2016 मध्ये पीयुसीच्या विविध विषयांसाठी 28 तर 2015 मध्ये 23 ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. यावर्षी हे प्रमाण 8 आहे. पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नोंदवलेल्या आक्षेपाप्रमाणे विषयनिहाय तज्ज्ञ समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रेस मार्क्स देणार असल्याचे पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका सी. शिखा यांनी स्पष्ट केले आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, HSC Examination, English paper, Physics, Grace mark,