Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Belgaon › ड्रग माफियांविरोधात ‘गुंडा’

ड्रग माफियांविरोधात ‘गुंडा’

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 14 2018 12:54AMबंगळूर : प्रतिनिधी

अनेक जण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. ‘उडता पंजाब’प्रमाणे राज्याचे ‘उडता कर्नाटक’ होऊ देणार नाही. ड्रग माफियांवर गुंडा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

बेळगावही रडारवर

कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गांजा पिकवला जातो. उसाच्या फडांमध्ये गांजाची चोरटी लागवड केली जाते. विशेषतः अथणी, रायबाग पट्ट्यात ही लागवड अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेथून गांजा बेळगावला सप्लाय केला जातो. त्यामुळे बेळगावही ड्रग माफियांसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. याआधीही बेळगावातून ब्राऊन शुगर, गांजा, कोकेन जप्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर गुंडा कायद्याची अंमलबजावणी झाली, तर या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. गुंडा कायद्याखाली संशयिताला तडीपार करण्याची तरतूद आहे.

शुक्रवारी नियम 69 अंतर्गत अमली पदार्थांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना परमेश्‍वर बोलत होते. ड्रग माफियांकडून विद्यार्थ्यांना लक्ष्य बनविले जाते. प्रतिष्ठित कॉलेज परिसरात तसेच मोक्याच्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री केले जाते. याविषयी पोलिस वरिष्ठाधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. यापुढे कोणत्याही ठिकाणी अमली पदार्थ प्रकरणे उघडकीस आली, तर संबंधित पोलिस अधिकार्‍यांना जबाबदार ठरविण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवायही शासनाने काही ठोस उपाययोजना यासाठी केल्याची माहिती परमेश्‍वर यांनी दिली. अधिवेशन काळात राज्यातील अमली पदार्थांच्या सुळसुळाटाविषयी चर्चा झाली होती. त्याच वेळी याविरोधात सरकार ठोस पाऊल उचलणार असल्याचे सांगितले होते. 

अमली पदार्थाचा सुळसुळाट आताच पसरलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. त्यामुळेच 1985 मध्ये याबाबतचा कायदा जारी करण्यात आला. आता त्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय प्रसारही वाढला आहे. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी असणार्‍या गावांमध्ये काही औषध कंपन्या आहेत. त्या ठिकाणी औषधी गोळ्यांच्या माध्यमांतून अमली पदार्थ इतर ठिकाणी, विदेशी पाठविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी कस्टम अधिकार्‍यांनी 5 कोटी रुपयांच्या अशा औषधी गोळ्या विमानतळावर जप्‍त केल्या होत्या. अमली पदार्थांवर नियंत्रणासाठी केवळ सरकारच नव्हे तर जनतेनेही सहकार्य करावयास हवे. आरोग्य, शिक्षण, अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांकडून त्यावर नजर असेल, असे परमेश्‍वर म्हणाले.त्याआधी भाजप आमदार आर. अशोक यांनी अमली पदार्थांचा विषय मांडला. त्यांना भाजप आमदारांसह विरोधी पक्षातील आमदारांनीही साथ दिली. सर्वपक्षीयांनी चर्चेत भाग घेतला.

आमदारांचा मुलगा होता व्यसनी

भाजप आमदार कळकप्पा बंडी यांनी चर्चेत भाग घेऊन आपला मुलगा अमली पदार्थाच्या विळख्यात साडपला होता, असे सांगितले. बंगळुरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेताना तो ड्रग माफियांच्या जाळ्यात अडकला. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्यासह कुटुंबीयांनी खूप कष्ट घेतल्याचे अनुभव त्यांनी कथन केले.