Thu, Jun 27, 2019 15:52होमपेज › Belgaon › काँग्रेस, भाजपकडून शेतकर्‍यांची घोर निराशा

काँग्रेस, भाजपकडून शेतकर्‍यांची घोर निराशा

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 8:42PMगुलबर्गा: वार्ताहर

कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि त्यापूर्वी सत्ता उपभोगलेल्या भाजपने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. आगामी निवडणुकीत निजद सत्तेवर आल्यानंतर 24 तासांत राज्यातील शेतकर्‍यांचे राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांकडून काढण्यात आलेले संपूर्ण कर्ज माफ करण्यात येईल, असे आश्‍वासन निजदचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एच. डी.कुमारस्वामी यांनी आळंद येथील जाहीर सभेत बोलताना दिले.

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी कुमारस्वामी  राज्यभर दौरा करत आहेत. यावेळी निजदचे नियोजित उमेदवार सूर्यकांत कोराळी, माजी मंत्री बंडेप्पा काशंपूर, निजदचे सरचिटणीस शामराव सुरण,सय्यद जाफर हुसैन, मल्लिनाथ पाटील, सिध्दाराम पाटील धन्नूर, बी. व्ही.चक्रवर्ती, शिवकुमार नाटीकर, नासीर हुसेन, बसवराज शास्त्री आदी उपस्थित होते. कुमारस्वामी म्हणाले, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जनतेला फसविल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून निजदकडे लोकांचा कल वाढला आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कर्जमाफीची घोषणा केली.

परंतु कोणत्याही राज्यात शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही. केंद्र सरकारने कर्ज माफ तर केलेच नाही उलट नोटाबंदी करून जनतेला वेठीस धरले आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांना मुक्त करण्याच्या गोष्टी करत आहेत. परंतु निजदने शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर शेतकरी यापुढे कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार केल्याचेही कुमारस्वामी यांनी सांगितले.