Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Belgaon › गटबाजीचे राजकारण राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी

गटबाजीचे राजकारण राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 8:29PM

बुकमार्क करा
जमखंडी : मोहन सावंत     

निवडणुका जवळ येऊ लागल्या की सर्वच पक्षांच्या व इच्छुक उमेदवारांच्या हालचाली गतिमान होतात. जमखंडीत गटबाजीचे राजकारण प्रमुख पक्षांची मोठी डोकेदुखी आहे. गेल्या निवडणुकीत गटबाजीचे रूपांतर बंडखोरीत होऊन पंचरंगी लढत झाली होती. नेत्यांनी यापासून धडा शिकला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

2013 मधील निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले नाही म्हणून नाराज झालेले उद्योगपती जगदीश गुडगुंटी यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून 28 हजार मते मिळवत शक्ती दाखवली होती. भाजपमधून केजेपी (कर्नाटक जनता पक्ष) मध्ये दाखल झालेले डॉ. उमेश महाबळशेट्टी यांनी 18 हजार तर भाजपधून निजदमध्ये प्रवेश केलेले  बी. एस. सिंधूर यांनी 10 हजार मते मिळविली. काँग्रेसचे सिद्दू न्यामगौड 49 हजार मते मिळवून विजयी झाले. भाजपचे श्रीकांत कुलकर्णी यांना 21 हजार मते मिळाल्याने ते तिसर्‍या स्थानावर राहिले.

मागील निवडणुकीत काँग्रेसतर्फे श्रीशैल दळवाई, सुशीलकुमार बेळगली, हाजी इलाही कंगनोळ्ळी या त्रिकुटाने गटबाजी करून तिघांपैकी एकाला उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. तिकीट मिळाले नाही तरी काँग्रेसमध्येच असलेले हे तिघे ग्रामीण कामे करण्यात आघाडीवर असून या कार्यक्रमात आ.सिद्दू न्यामगौडा यांचा सहभाग नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.

राज्यात व जमखंडीत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर साडेचार वर्षांत मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील भाग्य योजनेबरोबर आ. न्यामगौड यांनी जमखंडी परिसराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने अनेक योजना हाती घेतल्या.

काही महिन्यापासून  एमआरएन निराणी फाऊंडेशनने आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, बेरोजगाराना रोजगार प्रशिक्षण, स्पर्धात्मक परीक्षेसंबंधी मार्गदर्शन अशा कार्यक्रमांचा सपाटा चालविला आहे. भाजप सत्तेवर असताना आपण सुरू केलेल्या योजना सांगत पक्षाच्या चौकटीतून कार्य करण्याची परंपरा श्रीकांत कुलकर्णी करीत आहेत. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी कोणालाही दिली तरी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन कुलकर्णी देतात.