होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नाची तड लागेपर्यंत झुंज

सीमाप्रश्‍नाची तड लागेपर्यंत झुंज

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषेच्या हक्‍कासाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे  हुतात्म्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत झुंजत राहू, असा निर्धार सीमाबांधवांनी केला. 1 जून 1986 च्या कन्‍नडसक्‍ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना हिंडलगा येथे शुक्रवारी अभिवादन करण्यात आले.   मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे दीपक दळवी व कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 

दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील मराठी माणूस लढावू  आहे. लढ्यावेळी सारेजण आम्ही एकत्र असतो. मात्र, एकजूट दाखविण्याच्यावेळी वेगळी चूल मांडण्यात येते. यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीची वाटचाल सुरू असून सीमालढ्याचा सोक्षमोक्ष लावण्यात महाराष्ट्राचा पाठिंबा आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या पाठिंव्यावर सीमालढा पुढे न्यायचा आहे. विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला अपयश आले. आपल्यामध्ये काही उणिवा असल्यास त्या जनतेने आम्हाला सांगाव्यात. जनतेच्या पाठबळावर सीमालढा धगधगता ठेवायचा आहे.

हुतात्म्यांचे रक्त वाया जावू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणाच्यातरी रागातून कोणालाही वेठीला धरण्याचे काम जनतेने करू नये. चुकणार्‍यांना जाब विचारण्याचे काम करावे, असेही दळवी म्हणाले. कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, निवडणुकीतील पराभवापेक्षा सीमालढा महत्त्वाचा आहे. हा लढा हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून यापुढेही सुरूच ठेवावा लागेल. सीमाबांधवांना न्यायालयात निश्‍चित न्याय मिळणार असून प्रत्येकांने यामध्ये आपले योगदान द्यावे.

सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता प्रत्येकाने सीमालढा सुरू असेपर्यंत कार्यरत असणे आवश्यक आहे. ही त्यागाची चळवळ असून कोणत्याही अपयशाने संपणार नाही.माजी आ. अरविंद पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत घरभेद्यामुळे आपणाला अपयशाला सामोरे जावे लागले आहे. अशा बंडखोरांना जनतेने ओळखून त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे. समितीत दुही माजवून आपला स्वार्थ साधणार्‍यांना खड्यासारखे बाजुला करणे अत्यावश्यक आहे.निंगोजी हुद्दार यांनीही मनोगत व्यक्त केले. 

यावेळी प्रकाश मरगाळे, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, मराठी भाषिक युवा आघाडी अध्यक्ष  भाऊराव गडकरी, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर,  ता. पं. सदस्य रावजी पाटील, निरा काकतकर , प्रेमा मोरे, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, महेश जुवेकर, नगरसेवक विजय पाटील, रतन मासेकर, सरिता पाटील, दत्ता उघाडे, अ‍ॅड. शाम पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, ईश्वर गुरव, चेतक कांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.