Thu, Jun 27, 2019 14:36होमपेज › Belgaon › पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलाने

पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलाने

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:21PMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश या तिघांचीही हत्या एकाच पिस्तुलाने झाल्याचा निष्कर्ष विशेष तपास पथकाने काढला आहे.

गौरी यांच्या हत्येसाठी 7.65 मि.मी.ची पिस्तूल वापरण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तेच पिस्तूल कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आले होते, असे आता तपास पथकातील अधिकार्‍यांनी म्हटले आहे. कॉ. पानसरे यांची हत्या 20 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात झाली होती. तर डॉ. कलबुर्गी यांची हत्या 30 ऑगस्ट 2015 मध्ये धारवाडमध्ये झाली. गौरी यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरात झाली. तिघांवरही त्यांच्या घराजवळच गोळ्या झाडण्यात आल्या.

गौरी यांची हत्या विजापूर जिल्ह्यातील परशुराम वाघमारेनेच केल्याचेही विशेष तपास पथकाने म्हटले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तपास पथकाने सहा जणांना अटक केली आहे.
उजव्या विचारसरणीच्या 60 जणांच्या गटाबरोबर वाघमारे हा सहभागी होता. परंतु, कोणत्याच ठिकाणी त्याच्या नावाचा उल्लेख केलेला नव्हता. हा 60 जणांचा गट पाच राज्यांमध्ये कार्यरत आहे. या गटाबरोबर हिंदुत्ववादी संघटना महाराष्ट्रातील हिंदू जागृती समिती व सनातन संस्थेशी संबंधित आहेत. परंतु, त्या 60 जणांच्या गटाचा संबंध या हत्येशी असल्याचा कोणताच पुरावा तपास पथकाला मिळालेला नाही. 

तपास पथकाच्या चौकशीनुसार या हत्यांमध्ये दोन संघटनांचा सहभाग आहे. या 60 जणांच्या गटाचा शोध आम्ही लावलेला असला तरी त्या गटाचे नेटवर्क मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकमध्ये असल्याची माहिती उघड झालेली आहे. या गटाचा संबंध उत्तर प्रदेशशी आहे का, त्याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. या गटामध्ये भरती करण्याचे काम एजंट म्हणून सुजितकुमार ऊर्फ प्रवीण याने केले आहे, असेही तपास पथकाचे म्हणणे आहे.     

गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात आणखी तिघांवर तपास पथकाचा संशय असून, त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. या मारेकरी टोळीने प्रसिद्ध कन्नड लेखक प्रा. के. एस. भगवान यांच्याही हत्येचा कट रचला होता, असे उघडकीस आले आहे.सिंदगी येथील परशुराम वाघमारेचे कुटुंबीय घरोघरी जाऊन भांडी विकण्याचा व्यवसाय करतात. परशुराम हा हिंदू संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत असून, अथणी येथे 2011 साली हिंदू संघटनेच्या वतीने आयोजित शस्त्र प्रशिक्षण शिबिरातही तो सहभागी झाला होता, असे समजते. भीमाकाठच्या काही गुन्हेगारी प्रवृतीचा युवकांशी त्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. 

2012 साली सिंदगी तहसीलदार कार्यालयासमोर पाकिस्तानचा ध्वज फडकावल्याप्रकरणी परशुरामला पोलिसांनी अटक केली होती. काही महिन्यांतच त्याला जामीन मिळाला होता. तर तीन वर्षांनंतर या प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झाली होती. परशुरामचा हा इंडी, सिंदगी, अफजलपूर या परिसरातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी संबंध असल्यामुळे सुपारी घेऊन झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने गौरी लंकेश यांची हत्या केली असेल का, असाही प्रश्‍न तपास यंत्रणेसमोर आहे.

गिरीश कर्नाडसह मान्यवरांची डायरीत नावे

गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या डायरीमध्ये प्रसिद्ध चित्रपट अभिनेते गिरीश कर्नाड यांच्याबरोबरच काहींची नावे आढळून आलेली आहेत. या डायरीमध्ये देवनागरीमध्ये ही नावे लिहिल्याचे आढळून आले आहे. हिंदुत्वविरोधी भूमिका घेतलेल्यांना त्यांनी टार्गेट केल्याचेही तपास पथकाला चौकशीत आढळून आले आहे. त्यांच्याबरोबरच राजकारणी, माजी मंत्री बी. टी. ललिता नाईक व मठाधीश वीरभद्र चन्नमल्ल स्वामी व सी. एस. द्वारकानाथ यांची नावेही त्यांच्या डायरीमध्ये आढळून आलेली आहेत.