होमपेज › Belgaon › पिचकारीबहाद्दरांमुळे सरकारी कार्यालये अस्वच्छ

पिचकारीबहाद्दरांमुळे सरकारी कार्यालये अस्वच्छ

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 11:33PMखानापूर : राजू कुंभार

शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर पिचकार्‍या मारून त्या घाण करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसते. प्रत्येक कार्यालयाच्या भिंती पान आणि गुटख्याच्या पिचकार्‍यांनी रंगल्या आहेत. कार्यालयातील स्वच्छतागृहे आणि व्हरांड्यातील कोपरे पिचकारीने लाल झाले आहेत. कार्यालयात अनेक ठिकाणी न थुंकण्याबाबत फलक असूनही त्या फलकांवरही थुंकण्याचा प्रकार झाला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा खानापुरातील सरकारी कर्मचार्‍यांवर कसलाच परिणाम झालेला नाही .

तहसील कार्यालय, जि. पं. उपविभाग, सरकारी दवाखाना, कृषी खाते, बीईओ, समाजकल्याण, ता पं.आदी कार्यलयांच्या भिंती पिचकार्‍यांनी रंगल्या आहेत.स्वच्छतेची प्रथम जबाबदारी असणारे कर्मचारीच अस्वच्छता पसरवत असतील तर सामान्यांकडून कोणती अपेक्षा करावी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयातील  पांढर्‍याशुभ्र भिंतीवर  लालभडक पिचकार्‍यांनी अनेक प्रकारची नक्षी रेखाटली असून कार्यालयाच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहे. मधल्या भागात ज्या ठिकाणी बगीचा आहे ती संरक्षक भिंत पिचकार्‍यांमुळे लाल रंगात न्हाऊन गेली आहेच, शिवाय प्रत्येक अधिकार्‍याच्या कक्षाच्या खिडक्यातून मारल्या जाणार्‍या पिचकारींनी भिंती रंगल्या आहेत. वरच्या मजल्यावर जाणार्‍या जिन्याच्या भिंतीदेखील बहाद्दरांच्या तावडीतून सुटलेल्या नाहीत. 

आरोग्यविषयक माहिती देणार्‍या आणि तंबाखू-गुटखाविरोधात कारवाई करणार्‍या नगरपंचायतीच्या उपविभागातही हा प्रकार चालतो. शासकीय दवाखान्यात अनेक ठिकाणी न थुंकण्याचे फलक आहेत,पण त्याच ठिकाणी पिचकार्‍या मारल्या जात आहे.अरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरी स्वच्छ भारत अभियाना दरम्यान काही प्रमाणात या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. पण महिनाभरातच पुन्हा पिचकार्‍यांनी रंगल्या. त्या-त्या कार्यालयातील अधिकार्‍यांकडून लक्ष देण्याची गरज असली तरी त्यांच्याकडून पावले उचलली जात नसल्याने हे प्रकार वाढीस लागले आहेत. 

उघड्यावर मुतारी..

कार्यालयातील स्वच्छरतागृहांमध्ये प्रचंड दुर्गंधी असल्यामुळे नागरिक आणि कर्मचारी त्याचा वापर टाळत आहेत. तहसील कार्यालयाच्या बाजूलाच उघड्यावर मुतारी निर्माण झाली आहे. कर्मचारी आणि नागरिक तेथे थांबलेले असतात. त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली असून कचराही साचला आहे.. 

दंडात्मक कारवाई करा...

पिचकारी बहाद्दरांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने कर्मचार्‍यांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक बनले आहे. येणार्‍या नागरिकांनीही कार्यालये स्वच्छ ठेवण्यास पिचकार्‍या मारणे टाळावे. याचे सूचनाफलक कार्यालयाबाहेर लावावेत. 

अधिकारी, कर्मचारीच आघाडीवर

पिचकार्‍या मारणार्‍यांमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचारीच  आघाडीवर आहेत. नागरिकांकडून क्‍वचितच पिचकारी मारली जाते. तहसील आणि नगरपंचायत कार्यालयातील काही अधिकारीच गुटखा खाऊन भिंती घाण करीत असतात. 

पिचकार्‍या आणि थोटके

कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. प्रत्येक कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या भिंती पिचकार्‍यांच्या रंगाने माखल्या आहेत. तेथे अर्धवट जळालेल्या  सिगारेट आणि विड्यांच्या थोटकांचा खच आहे. यामुळे स्वच्छतगृहांची दुरवस्था झाली आहे.दरवाजे उघडले की उग्र दर्प येतो.यामुळे त्यांचा वापर केला जात नाही.