Mon, Aug 19, 2019 06:55होमपेज › Belgaon › जिल्ह्यात एकाच शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत

जिल्ह्यात एकाच शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 7:16PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षांत 210 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून पैकी केवळ 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. मदत न मिळालेल्या जिल्ह्यांच्या यादीत सर्वाधिक 15 प्रकरणांसह बेळगाव आघाडीवर आहे. केवळ एकाच प्रकरणात मदत देण्यात आली आहे.

कर्जाचा बोजा आणि पीक नुकनसान या दोन मुख्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. त्यांचा जीव परत आणणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन सरकारकडून सांत्वन केले जाते. शेतकर्‍यांच्या समस्या कायमस्वरूपी निकालात काढल्यास आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार आहे. उत्तम बाजारपेठ, सुविधा उपलब्ध करणे, कृषी उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळाल्यास शेतकर्‍यांची आर्थिक सुधारण्यास मदत होईल. परिणामी आत्महत्येचे प्रमाणही घटणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च उचलण्याची योजना सरकारने गतवर्षी जारी केली. याला पॅकेजचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे मदतीची रक्‍कम तात्काळ मिळावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांची आहे.

राज्य सरकारकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जूनअखेरपर्यंत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील केवळ 20 जणांना शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. केवळ एका मुलाला वसतीगृहात प्रवेश मिळाला आहे. तुमकूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबात शिक्षण घेणारी मुले नाहीत आणि उर्वरित जिल्ह्यांत यासंबंधी कार्यवाही करण्यास विलंब झाला आहे. 

बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, उडपी या जिल्ह्यांत आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. चामराजनगर, चिक्‍कबळ्ळापूर, कोप्पळ येथे एकूण 5 प्रकरणे असून अजूनही आर्थिक मदत मिळालेले नाही. बेळगाव, रायचूरसह 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 52 प्रकरणे मदतीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहेत. पण, कुणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी यंदा कर्जमाफीची घोषणा केली. पण, त्यानंतरही 30 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.