Fri, Nov 16, 2018 13:39होमपेज › Belgaon › मोबाईल मिळाला, चोरटी पळाली...

मोबाईल मिळाला, चोरटी पळाली...

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 13 2018 11:23PMबेळगाव : प्रतिनिधी    

बसमधून प्रवास करणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाईल चोरून पळणार्‍या महिलेचा संशयाने रहदारी पोलिसांनी पाठलाग केल्याने मोबाईल परत मिळाल्याची घटना दुसरे रेल्वे गेट येथे घडली. गुरुवारी वेळ सायंकाळी 4 ची. दुसर्‍या रेल्वे गेटशेजारी बस थांबताच बसमधून उतरलेल्या महिलेने धूम ठोकून पळ काढला. रहदारी पोलिसांनी सदर पळणार्‍या महिलेकडे संशयाने पाहून पाठलाग केला. पोलिसाच्या मागून नागरिकही धावले. त्यांनी महिलेला गाठलेच. तोपर्यंत तिने मोबाईल रस्त्याशेजारी  रानात फेकला होता. 

लोकांच्या हाती सापडताच तिने आपण कुणाचेच काही चोरले नसल्याचे सांगितले. पण पाठलाग करणारे पोलिस बसवराज सिंदगार यांनी तिने रानात काहीतरी फेकल्याचे सूचित केले. काही जणांनी शोध घेतला असता मोबाईल सापडला. तोपर्यंत महिलेने धूम ठोकली. 

संतीबस्तवाड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी व तिचे पालक बसवराज माने बेळगावकडे येत होते. तिसर्‍या रेल्वे गेट येथे बसमध्ये चढलेल्या चोरट्या महिलेने सदर विद्यार्थिनीचा पर्समधील मोबाईल लांबविला होता. चोरटी महिला दुसर्‍या रेल्वे गेटजवळील बस थांब्यावर उतरून लगबगीने पळू लागली. यावेळी रहदारी पोलिस बसवराज सिंदीगार सेवा बजावत होते. रस्त्यावरून धावणार्‍या महिलेकडे पाहून सिंदगी यांनी पाठलाग केला. पोलिस पाठीमागे लागल्याचे पाहताच महिलेने हातातील मोबाईल रस्त्याकडेला फेकला. मोबाईल सापडल्यानंतर  काही वेळाने कॉल आला. पलीकडच्या व्यक्तीला मोबाईल चोरी गेला असल्याचा आणि तो सापडल्याचा निरोप देण्यात आला. दरम्यान, सदर मोबाईल सिंदिगार यांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात असून घेऊन जाण्यासाठी सांगितले. संबंधित संतीबस्तवाड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी व तिचे  पालकांनी  पोलिस स्थानकात येऊन मोबाईल मिळविला. रहदारी पोलिस बसवराज सिंदिगार यांच्या सतर्कतेमुळे मोबाईल मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.