Fri, Apr 26, 2019 10:00होमपेज › Belgaon › महाराष्ट्रात जायचेय...खड्डे पार करा!

महाराष्ट्रात जायचेय...खड्डे पार करा!

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 8:12PMबेळगाव : प्रतिनिधी

चंदगड तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या शिनोळी (खु.) येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महाराष्ट्रात जाणार्‍यांचे स्वागत खड्ड्यातून होत आहे. लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.बेळगाव-वेंगुर्ला रस्ता नेहमी गजबजलेला असतो. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने धावत असतात. गोवा, महाराष्ट्र, कोकणकडे धाव घेणार्‍यांकडून याच रस्त्याचा सर्रास वापर करण्यात येतो. शिनोळी औद्योगिक वसाहतीत शेकडो कामगार ये-जा करतात.  त्यांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकाची सीमा शिनोळी (बु.) आणि बाची या दोन गावांच्या मध्ये आहे. पुलावर दोन्ही राज्याची हद्द सुरू व समाप्त होते. कर्नाटकच्या हद्दीतील रस्ता चांगला केलेला आहे. त्याचबरोबर याठिकाणी पुरेसे रुंदीकरण केले आहे. मात्र महाराष्ट्राच्या हद्दीतील रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. यामुळे या मार्गावरून जाणार्‍या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे डांबर आणि खडी उखडली आहे. सदर खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. यामुळे अनेकवेळा या खड्ड्यातून वाहने घातली जातात. यातून अपघात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रवेश करताच खड्ड्यातून प्रवाशांचे स्वागत होते. यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत.

औद्योगिक वसाहत आणि फाट्यावरून येणारे पाणी रस्त्याच्या बाजूने गटारे नसल्याने थेट रस्त्यावरून वाहते. आजुबाजुच्या दुकानदारांनी दुकानासमोरील जागेत माती टाकून घेतली आहे. यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी गटारींची सोय नाही. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यातूनच जाते. यामुळे रस्त्यावर चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरते.याचबरोबर औद्योगिक वसाहती परिसरात गटारींची वानवा आहे. यामुळे या भागातील पाणीदेखील रस्त्यावरूनच धावते. या ठिकाणी दुचाकी चालकांना वाहन हाकताना कसरत करावी लागत आहे. यापूर्वी काही वेळा अपघात घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत पुढाकार घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

पावसात अपघाताची शक्यता

या ठिकाणी पावसाचे पाणी साचून निसरड निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका दुचाकीचालकांना बसत आहे. लहान अपघात होत आहेत. परिणामी या भागातून जाताना वाहतूकधारकांना कसरत करावी लागत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावरच पाणी साचल्याने प्रवाशांना घाण पाण्यापासून बचाव करण्यासाठी कसरत करावी लागते. यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.