Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Belgaon › शहरातील 5 उद्यानांमध्ये होणार ग्लास हाऊस

शहरातील 5 उद्यानांमध्ये होणार ग्लास हाऊस

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 8:19PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीला पूरक या दृष्टीने बेळगाव शहर विकास प्राधिकारने शहरातील पाच उद्यानांमध्ये ग्लास हाऊसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सव्वा कोटी रु. ची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती बुडा आयुक्त शकील अहमद यांनी दिली.

शाळा -महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, महिला संघ -संस्थांना व त्या त्या वसाहतीमधील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम करायला, विविध स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन व इतर कार्यक्रम सादर करण्यासाठी या ग्लास हाऊसचा वापर करता येणार आहे. त्यासाठी माळमारुती वसाहतीमध्ये तीन, श्रीनगर व महांतेशनगरमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 5 ग्लास हाऊसची निर्मिती करण्यासाठी बुडाने पावले टाकली आहेत. जिल्हाधिकारी व बुडाचे प्रशासक एस. झियाऊल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बुडाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बागायत खात्यातर्फे  व्हॅक्सीन डेपो परिसरात उभारण्यात आलेले ग्लास हाऊस एक आदर्श ठरलेले असून ही पाच ग्लास हाऊसची निर्मिती बागायत खात्यातर्फेच केली जाणार आहे. सदर कामासाठी प्रारंभ करण्याच्या उद्देशाने निविदा मागविल्या आहेत.

प्रत्येक ग्लास हाऊससाठी 25 लाख रु. चा खर्च केला जाणार आहे. येत्या दोन महिन्याच्या कालावधीत 5 ही ग्लास हाऊसचे कामकाज पूर्ण करून घेण्याचे उद्दिष्ट बुडाने ठेवले आहे. बेळगावमध्ये योग, फलपुष्प प्रदर्शन यासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास या ग्लास हाऊसमुळे सोयीस्कर ठरणार आहे. बेळगावमध्ये एकाचवेळी पाच ग्लास हाऊस निर्माण करण्यात येत असल्याने राज्यात बेळगाव शहराचा प्रथम क्रमांक लागणार आहे. राज्यातील  कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरात  एकाचवेळी पाच ग्लास हाऊस कोठेच निर्माण केलेली नाहीत. येत्या काही कालावधीत बुडा व्याप्तीतील वसाहतींमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भवन बांधण्याची योजनाही हाती घेण्यात येणार असल्याचे बुडा आयुक्तांनी सांगितले.

बेळगाव शहरातील संभाजी उद्यानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व कलाकृतींचे प्रदर्शन एकाच ठिकाणी सादर करता यावे, यासाठी भवन निर्माण करण्यासाठी 5.25 लाख रु. च्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याच उद्यानामध्ये ग्लास हाऊस उभारण्याची योजना असल्याचेही बुडा सूत्रान्वये सांगण्यात आले.