Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Belgaon › देशातील युवा संशोधकांना संधी द्या

देशातील युवा संशोधकांना संधी द्या

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:31AMबेळगाव : प्रतिनिधी

देशात मोठ्या प्रमाणात हुशार युवा संशोधक तयार होत आहेत. मात्र ते बेरोजगार आहेत. नोकरीच्या शोधात त्यांना परदेशात जावे लागत आहे. त्यासाठी देशातील युवा संशोधकांना संधी द्या. देशात तयार होणार्‍या स्वदेशी वस्तू वापरा. त्यातच देशाची भरभराट आहे, असे प्रतिपादन कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी केले.

विश्‍वेश्‍वरय्या   तांत्रिक विद्यापीठात (व्हीटीयू) शुक्रवारी 20 व्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व्हीटीयूच्या एपीजे अब्दूल कलाम सभागृहात करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, जीवनात शिस्तीला महत्त्व देतात तेच यशस्वी होतात. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. देशात बुध्दीवंतांची कमी नाही. त्यांना संधी मिळत नसल्याने ते परदेशात नोकरीच्या शोधात जात आहेत. मिसाईल मॅन म्हणून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांनी वेगळी ओळख तयार केली. भूगर्भ शास्त्रात पाण्याचे संशोधन पद्मभूषण डॉ. व्ही. के. अत्रे करत आहेत. कर्नाटकात हेलिकॉप्टर व विमान बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित आहे. महात्मा गांधीजींनी सांंगितल्याप्रमाणे स्वदेशी वस्तू वापरण्याची गरज आहे. देशात 70 टक्के संशोधक ग्रामीण भागात आहेत. त्यांना संधी मिळाली तर ते त्याचे सोने करतील. 

व्यासपीठावर उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विश्‍वेश्‍वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. करिसिध्दाप्पा  यांनी स्वागत व पाहुण्यांची ओळख करुन दिली. रजिस्ट्रार सतीश अन्नीगेरी यांनी विश्‍वेश्‍वरय्या  तांत्रिक विद्यापिठाची माहिती दिली. प्रमुख पाहुणे या नात्याने पद्मभूषण डॉ. व्ही. के. अत्रे यांनी मार्गदर्शन भाषण केले. उच्च शिक्षणमंत्री जी. टी. देवेगौडा यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले डॉ. राजशेखरय्या, डॉ. के. बलवीररेड्डी, डॉ. एच. पी. खुजा, खा. डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. बी. जी. संगमेश्वर, डॉ. एस. बी. सबंरगीमठ, डॉ. एम. बी. बगळे, डॉ. एम. एच. शिवकुमार, डॉ. एच. बी. सुधाकर नाईक, डॉ. रामचंद्रनरेड्डी, डॉ. के. बी. बालाजी, डॉ. एस. ए. कुरी, डॉ. डी. एस. कृष्णमूर्ती, डॉ. वेंकटेश, डॉ. जी. एम. कृष्णमूर्ती, डॉ. श्रीधर यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  

....तरच देशाची भरभराट होईल

देशात आयकर खात्याच्या माध्यमातून 400 कोटीपेक्षा जादा रक्कम जमा झाली आहे. ती रक्कम सर्व क्षेत्रातील युवा संशोधनकांसासाठी खर्च करावी. तांत्रिक विद्यापीठांनी जमा झालेली रक्कम ठेव स्वरुपात न ठेवता. युवा संशोधकांना संधी देऊन त्यांच्याकडून नवनिर्मितीला चालना द्यावी. तरच देशाची भरभराट होईल. परदेशात आवश्यक किमती वस्तू आयात करुन त्याप्रमाणे पेटंट बनवून ते उपयोगात आणावे. त्यामुळे आयातीवर होणार्‍या खर्चाला आळा बसेल.