Mon, Feb 18, 2019 18:00होमपेज › Belgaon › पेट्रोलसाठी हेल्मेटसक्‍ती अंशतःच

पेट्रोलसाठी हेल्मेटसक्‍ती अंशतःच

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMबेळगाव : प्रतिनिधी

हेल्मेटधारी दुचाकीचालकांनाच पेट्रोल देण्याचा निर्णय पहिल्या दिवशी अंशतः यशस्वी झाला. शहरातील प्रमुख पंपांवर केवळ हेल्मेटधारींनाच पेट्रोल देण्यात आले. त्यासाठी बहुतांशी पंपांवर पोलिसही नियुक्‍त करण्यात आले होते. त्यामुळे पेट्रोलची विक्री निम्म्याने कमी झाली. 

नो हेल्मेट, नो पेट्रोल अभियान बुधवारपासून शहरात सुरू झाले. सकाळपासूनच चन्‍नम्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, किल्ला परिसरातील पंपांवर पोलिस नियुक्‍त करण्यात आले होते. त्यामुळे या भागातील पंपांवर केवळ हेल्मेटधारींना पेट्रोल देण्यात आले. ज्या दुचाकीचालकांकडे हेल्मेट नव्हते, त्यांना पंप कर्मचार्‍यांकडून परत पाठवण्यात आले. काही दुचाकीचालकांनी कर्मचार्‍यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काहीजणांवर दंडात्मक कारवाईही केली. तर काहीजणांना प्रबोधनाच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले.

आयुक्‍तांची फेरी

दुपारनंतर आयुक्‍त डी. सी. राजप्पा यांनी काही पंपांना भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचेही दुचाकीधारकांना सांगण्यात आले. उपनगरातील पंपांवरही ही दोन दिवसात पोलिस नियुक्‍त करून सक्‍ती केली जाईल, अशी माहितीही अधिकार्‍यांनी दिली.