होमपेज › Belgaon › वसतिगृहांची वानवा, विद्यार्थिनी असुरक्षित

वसतिगृहांची वानवा, विद्यार्थिनी असुरक्षित

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 10:11PMखानापूर : राजू कुंभार

खानापूर तालुक्याच्या पश्‍चिमेकडील दुर्गम भागात मुलींच्या वसतिगृहांची सोय नसल्याने विद्यार्थिनी असुरक्षित असून अर्ध्यावरच शाळा सोडण्याची वेळ कित्येक मुलींवर आली आहे. नव्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि नव्या सरकारच्या कार्यकाळात ही समस्या सुटण्याची अपेक्षा आहे.

वनप्रदेशाने वेढलेल्या आणि पावसाचे सर्वाधिक प्रमाणा असणार्‍या पश्‍चिमेकडील दुर्गम खेड्यांची बिकट स्थिती आहे. कित्येक मैल प्रवास करुन खडतर रस्त्यावर चालत जाऊन शिकून अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मजल मारली आहे. मात्र सध्या वन्यप्राणी आणि गुन्हेगारी वाढल्याने विद्यार्थी असुरक्षित आहेत.

सध्या तालुक्यात इटगी, खानापूर, लोंढा, हलशी, जांबोटी आणि शिरोली येथे वसतीगृहे आहेत. यापैकी खानापूर आणि इटगी या दोनच ठिकाणी मुलींचे वसतीगृह आहे. खानापुरात  अनुसूचित जातींच्या मुलींसाठी वसतिगृह असून त्यामध्ये इतर मुलींना प्रवेश नाही. खानापूर केंद्रातील एकमेव सामान्य मुलींच्या दहावीपूर्व वसतीगृहात 50 जागा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी 100 जागा, समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात 65 जागा आहेत.  त्यामुळे इतर मुलींना वंचित राहावे लागतेे. त्यासाठी शिरोली, जांबोटी आणि कणकुंबी या तीन ठिकाणी मुलींची वसतिगृहे होणे अत्यंत गरजेचे आहे.

जामगाव, हेम्मडगा, अबनाळी, पाली, हेम्मडगा, डोंगरगाव, देगाव, गवाळी, पास्टोली, कोंगळा आणि तळेवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी  शिरोली याठिकाणी मुलांच्या वसतीगृहाची सोय झाली आहे. मात्र मुलींना वंचित राहावे लागले आहे.

जांबोटी केंद्राचीही अशीच अवस्था असून केवळ मुलांचे वसतीगृह खासगी इमारतीत सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणीही विद्यार्थिनींवर अन्याय झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणी आणि नशाबाज तरुणांच्या दहशतीखाली विद्यार्थिनींना प्रवास करुन शाळा गाठावी लागत आहे.