Tue, Jun 18, 2019 22:56होमपेज › Belgaon › आधी शौचालये उभारा,नंतर दंड आकारा

आधी शौचालये उभारा,नंतर दंड आकारा

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 23 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त बेळगावची घोषणा करण्यात येणार आहे. यासाठी प्रातर्विधी उघड्यावर उरकणार्‍यांवर 500 रुपयाचा दंड आकारण्याची तरतूद मनपाकडून करण्यात येणार आहे. याला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. मनपाने आधी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी शौचालये उभारावीत, नंतरच दंड आकारावा, अशी भूमिका घेण्यात आली. मनपाची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी झाली. महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी व उपमहापौर मधुश्री पुजारी उपस्थित होत्या. 

शहरात 2014 पासून ‘घर तेथे शौचालय’ उभारणीची मोहीम सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद लाभला असून हागणदारीमुक्त शहर करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. घोषणेचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. पंधरा दिवसात नागरिकांच्या सूचना मागवून त्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. नंतरच खुल्या जागेत शौचालयाला जाणार्‍यांना 500 रु. दंडाची तरतूद करावी, असा ठराव मांडण्यात आला.

ठरावाला नगरसेवकांनी विरोध केला. नगरसेवक राजू बिर्जे म्हणाले, स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली निव्वळ फसवणूक सुरू आहे. जुनी शौचालये दाखवून अनुदान उकळण्यात येत आहे. याबाबतचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून याला अधिकारी जबाबदार आहेत. यासाठी मनपाने स्वत: शौचालय उभारण्याची जबाबदारी स्वीकारावी. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल.

अ‍ॅड. रतन मासेकर म्हणाले, शहरात ग्रामीण नागरिक येतात. त्यांच्या सोयीसाठी शहर परिसरात पुरेशी शौचालये नाहीत. त्यांना उघड्यावर विधी उरकावा लागतो. यामध्ये महिलांची गैरसोय होते. त्यांना 500 रुपये दंड आकारणे योग्य नव्हे. मनपाने पुरेशी शौचालये उभारावीत, नंतर दंड आकारावा.

पुष्पा पर्वतराव म्हणाल्या, उपनगरात सुरू असणारी बांधकामे, हॉटेल व्यावसायिक, इस्पितळे या ठिकाणी पुरेशा शौचालयांची सोय नाही. यामुळे तेथील कामगार, ग्राहक रस्त्यावरच नैसर्गिक विधी उरकत असतो. अशा आस्थापनांच्या मालकाकडून दंड आकारण्यात यावा. महेश नाईक, विजय भोसले, मनोहर हलगेकर, संजय शिंदे यांनी सूचना मांडल्या.

 

Tags : belgaon, belgaon news,  Belgaum Municipal Corporation, General Meeting,